नवी दिल्ली : मरिन ड्राइव्ह ते कांदिवलीपर्यंत असलेल्या प्रस्तावित कोस्टल रोडला एका महिन्यात पर्यावरण खात्याची परवानगी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेतली.
मुंबई महापालिकेचा प्रस्तावित कोस्टल रोडचा मार्ग विविध परवानग्यांसाठी अडकून पडला होता. मुंबईशी संबंधित असलेल्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. सीआरझेडची परवानगी मिळाल्यानंतर रखडलेल्या झोपडपट्यांचे पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने कोस्टल रोडचा मुद्दा चर्चेत ठेवला होता. कोस्टल रोडसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अडवून ठेवल्याची टीका शिवसेनेने केली होती.