गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, आसामला लागून असलेली भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा युद्धपातळीवर बंद करण्यात यावी, अशी मागणी बीएसएफकडे केली आहे.
भारत आणि बांगलादेश या सीमेवरून होत असलेली घुसखोरी रोखण्याच्या आश्वासनावर भाजपने याठिकाणी सत्ता मिळविली होती. आता विरोधकांकडून याच मुद्द्याची आठवण सत्ताधाऱ्यांनी करून देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बीएसएफला सीमा बंद करण्यास सांगितले आहे.
बांगलादेश सीमेवरून होत असलेल्या घुसखोरीबद्दल विरोधी पक्षांकडून सोनोवाल यांच्या सरकारवर टीका करण्यात आल्यानंतर त्यांनी लगेच हा निर्णय घेतला आहे.
गुवाहाटी येथे बीएसएफचे अधिकारी के. के. शर्मा आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. आपल्या सीमेवर जवान तैनात आहेत. नागरिकांना सुरक्षितता वाटेल, असे वातावरण तयार करण्यात येईल, असे सोनोवाल यांनी सांगितले.