सईदला 'साहेब' म्हणण्याबद्दल संयुक्त राष्ट्रानं मागितली माफी

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका समितीनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातीचा प्रमुख सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या नावावरून 'साहिब' शब्द हटवत एक माफीपत्र सादर केलंय. 

Updated: Dec 23, 2014, 04:40 PM IST
सईदला 'साहेब' म्हणण्याबद्दल संयुक्त राष्ट्रानं मागितली माफी title=

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका समितीनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातीचा प्रमुख सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या नावावरून 'साहेब' शब्द हटवत एक माफीपत्र सादर केलंय. 

दहशतवादी हाफीज सईदला 'साहेब' म्हटल्यानंतर भारतानं यावर जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रानं यावर खेद व्यक्त केलाय. अल कायदा प्रतिबंध समितीनं आणखी एक पत्र जाहीर करून १७ डिसेंबर रोजीच्या आपल्या पत्रात आपली चूक झाली असं कबूल केलंय. याविषयी त्यांनी खेदही व्यक्त केलाय. 

समितीचे अध्यक्ष गॅरी क्युइनलान हे संयुक्त राष्ट्रमध्ये ऑस्ट्रेलियाचे स्थायी प्रतिनिधीही आहेत. क्युइनलान यांनी बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक सईद यांच्यासंबंधी सूचना देण्यासाठी जाहीर केलेल्या संदेशात हाफीज सईदचा उल्लेख 'साहेब' असा केला होता. नव्या पत्रात स्पष्ट रुपात या पाकिस्तानी दहशतवाद्याचा उल्लेख हाफिज मोहम्मद सईद असा केला गेलाय. 

संयुक्त राष्ट्रानं डिसेंबर २००८ मध्ये जमात - उद - दावा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.  हाफीज सईद याला देखील संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी म्हणून घोषित केलंय. तरीही सईद पाकिस्तानात मोकळेपणानं फिरताना दिसतो... तसंच त्याच्या सार्वजनिक सभाही होतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.