नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या स्थलांतर (इमिग्रेशन) अर्जावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रच काँग्रेसने सादर केले. दरम्यान, भाजपने राजे यांची पाठराखण केली आहे.
राजे यांची सही असलेला हा मोठा पुरावा असून यापेक्षा अधिक पुरावा देण्याची गरज नाही, असा हल्ला काँग्रेसने चढविला आणि वसुंधरा राजे यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
वसुंधरा राजे यांनी १८ ऑगस्ट २०११ रोजी सही केलेला दस्तऐवज जाहीर झाला आहे. ही बाब उघडकीस आली तेव्हा त्यांनी प्रथम दुर्लक्ष केले आणि त्यानंतर आपल्याला स्मरत नसल्याचे सांगितले, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले.
ललित मोदी यांनी केलेल्या कोणत्याही इमिग्रेशन अर्जासाठी आपण हे निवेदन देत आहोत, मात्र कोणत्याही स्थितीत भारतीय अधिकाऱ्यांना याची कल्पना येऊ नये, असे वसुंधरा राजे यांनी दस्तऐवजात म्हटले आहे. वसुंधरा राजे यांच्याविरोधात दस्तऐवज सादर केल्यास त्यांना दोषी धरता येईल, असे भाजप सातत्याने सांगत होते. आता हा धडधडीत पुरावा समोर आहे, असे रमेश म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. परंतु त्यांचे राजीनामे घ्यायला हे काही त्यांचे सरकार नाही, रालोआचे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देत त्यांची पाठराखण केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.