नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंह जवळपास १५ मिनिटं तिथं होते. काँग्रेसचे मनीशंकर अय्यर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एकीकडे देशात शहीद दिनानिमित्त क्रांतीवीरांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतांना देशाच्या सुरक्षेला वारंवार आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन दिल्लीत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. नवी दिल्लीतल्या पाकिस्तान उच्चायुक्तालय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. काश्मीरचे फुटीरतावादी नेते सय्यैद अली शाह गिलानीही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान दिनानिमित्त पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी लिहिलेल्या चिठ्ठीत शुभेच्छांसोबतच शरीफ यांचे कान उघाडणीही केली.
पाकिस्तानला दहशतवाद आणि हिंसेला काबूत ठेवण्याची गरज असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात चर्चेची कवाडं खुली होतील असंही मोदींनी नमूद केलं आहे. २३ मार्चला दरवर्षी पाकिस्तानात राष्ट्रीय दिन पाळण्यात येतो. १९४० साली झालेल्या लाहोर अधिवेशनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.