मंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!

दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 24, 2013, 09:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
नुकतंच, ‘आप’नं आपल्या मंत्रिमंडळातील संभाव्य सहा नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये, आपल्या नावाचा समावेश नसल्यानं बिन्नी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकले. त्यांच्याशी काही वेळ झालेल्या चर्चेनंतर ते क्रोधात बाहेर पडले. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी एव्हढंच म्हटलं की, ‘उद्या मी मोठा खुलासा करेन’ आणि त्यांनी काढता पाय घेतला.
आम आदमी पार्टी उद्या दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची चिन्हं आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासहीत अनेक मंत्री उद्या शपथ घेणार आहेत.
केजरीवाल यांच्या या मंत्रिमंडळात पटपडगंज विधानसभेतून विजय प्राप्त करणारे माजी पत्रकार मनिष सिसोदिया यांच्याशिवाय राखी बिडला, सोमनाथ भारती, सौरभ भारद्वाज, गिरीश सोनी आणि सतेंद्र जैन यांचा समावेश आहे. केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भारद्वाज यांनी ही माहिती दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.