पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून रिक्षांची भाडेवाढ

पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त जनतेला महिन्याचे बजेट सांभाळतांना कसरत करावी लागणार आहे.

Updated: Oct 6, 2013, 05:53 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, पुणे
पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त जनतेला महिन्याचे बजेट सांभाळतांना कसरत करावी लागणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षा भाडेवाढ होणार आहे. त्यानुसार आता पहिला टप्पा एक किलोमीटर ऐवजी दीड किलोमीटरचा करण्यात आला असून, त्यासाठी सतरा रुपये भाडे राहणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ११ रुपये ६५ पैसे भाडे राहणार आहे. या भाडेवाढीमुळे रिक्षात बसल्यानंतर किमान सतरा रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
प्रवाशांसाठी आनंदाची बाब म्हणजे रात्री बारानंतरच्या प्रवासासाठी मूळ भाड्याच्या पन्नास टक्क्यांऐवजी आता २५ टक्केच भाडे आकारणी रिक्षाचालकांना करता येणार आहे. प्रवाशांना मोठय़ा सामानासाठी प्रत्येक नगास तीन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या पहिल्या किलोमीटरसाठी अकरा रुपये, तर नंतरच्या पुढील टप्प्यासाठी दहा रुपये असा दर आहे.
रिक्षा चालकांना सुधारित भाड्याच्या मीटरचे पुर्नप्रमाणिकरणासाठी आरटीओने ४५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरच्या आत मीटरचे पुर्नप्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. मुदतीमध्ये मीटरमध्ये बदल न केल्यास त्यांना व्यवसाय करता येणार नाही, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.