इजिप्तः फुटबॉल मॅचनंतर हिंसाचार, ७३ ठार

इजिप्तच्या पोर्ट सैद शहरात फूटबॉल सामन्यानंतर उसळलेल्या दंगलीत जवळपास ७३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Updated: Feb 2, 2012, 01:16 PM IST

www.24taas.com, इजिप्त

 

इजिप्तच्या पोर्ट सैद शहरात फुटबॉल सामन्यानंतर उसळलेल्या दंगलीत जवळपास ७३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. आजवर इजिप्तच्या फुटबॉल इतिहासातील ही सर्वाधिक भयावह घटना आहे.

 

इजिप्तच्या उप आरोग्य मंत्र्यांनी ही घटना दुर्दैवी  आणि वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आजवर अशा स्वरुपाच्या घटना दक्षिण अमेरिकेत घटल्याची उदाहरणे आहेत, पण आशिया खंडात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराची घटना घडली आहे. इजिप्तमधील सर्वात यशस्वी मानल्या गेलेल्या क्लब अल अहली आणि पोर्ट सैद शहरातील क्लब अल मसरी यांच्यातील फुटबॉल सामन्याच्या दरम्यान ही घटना घडली. टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेल्या फूटेजमध्ये फूटबॉलचे चाहते मैदानावर अहलीच्या खेळाडूंचा पाठलाग करताना दाखवण्यात आले आहेत. मैदानातील घुसखोरीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  इजिप्तच्या संसदेने या घटनेनंतर तातडीचे अधिवेशन भरवण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे.

 

इजिप्तच्या फुटबॉल फेडरेशनने प्रिमीयर लिगचे सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहेत. इजिप्तच्या सरकारी यंत्रणेने हिंसाचाराच्या घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आता पर्यंत या प्रकरणी ४७ लोकांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे.