फ्लोरिडा प्रायमरीत मिट रोमनेंनी बाजी मारली

मिट रोमने यांनी फ्लोरिडाच्या रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रायमरीत बाजी मारली आहे. मिट रोमनेंच्या विजयामुळे राष्ट्रध्यक्षपदाचे नामांकनाच्या स्पर्धेत ते बाजी मारतील अशी चिन्हे आहेत.

Updated: Feb 1, 2012, 01:49 PM IST

www.24taas.com, फ्लोरिडा

 

मिट रोमने यांनी फ्लोरिडाच्या रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रायमरीत बाजी मारली आहे. मिट रोमनेंच्या विजयामुळे राष्ट्रध्यक्षपदाचे नामांकनाच्या स्पर्धेत ते बाजी मारतील अशी चिन्हे आहेत. तसं झाल्यास रोमने हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसमोर उभे ठाकतील. मिट रोमने यांनी आपले प्रमुख प्रतिस्पर्धी निव्ट गिंगरिच यांना पिछाडीवर ढकललं असलं तरी गिंगरिच यांनी लढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

 

एकूण मतदानापैकी ७० टक्के मतमोजणीनंतर रोमने यांना ४७ टक्के तर गिंगरिच यांना ३२ टक्के मते पडली. यंदाच्या वर्षात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नामांकनाच्या चार मोठ्या लढतींपैकी ही सर्वात मोठी लढत आहे. फ्लोरिडा मतदानाच्या अखेरीस अमेरिकन टेलिव्हजन नेटवर्कनी रोमने विजयी असल्याचं चित्र रंगवलं होतं.

 

या विजयामुळे रोमने यांनी गिंगरिंच यांच्या विरुध्द साऊथ कॅरोलिना प्रायमरीत झालेल्या पराभवाची भरपाई करत परत एकदा झेप घेतली आहे. रोमने हे मॅसाच्युसेट राज्याचे माजी गर्व्हनर आहेत. धनाढ्य असलेल्या रोमने यांनी ओपिनियन पोलमध्येच आक्रमक पध्दतीने गिंगरिच यांना पिछाडीवर टाकलं. रोमनेंच्या नकारात्मक जाहीरातीच्या भडीमाराने गिंगरिच यांना गारद केलं.