www.24taas.com, नवी दिल्ली
दहशतवादी हल्ले हे मौज मजा आणि ऐय्याशीसाठी करत असल्याचा उलगडा झाला आहे. जगभरात दहशतवाद पसरविणारे दहशतवादी कोणत्याही जिहादी विचारधारेने प्रेरित नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. दहशतवादी हे केवळ ऐय्याशीसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत.
देशभरात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांचा तपास करताना ही बाब समोर आली आहे. इंडियन मुजाहिदीनसारख्या संघटनेचे छोटे कार्यकर्तेच नव्हे तर बडे कमांडरही याच मानसिकतेने काम करित असल्याचे तथ्य समोर आले आहे. पुण्याच्या येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीनचा कातिल सिद्दीकी याने चौकशीदरम्यान ब-याच गोष्टींचा खुलासा केला होता. त्याच्या चौकशीतूनच ही बाब समोर आली आहे.
घातपात घडविण्यासाठी नव्या लोकांना जोडण्याकरिता त्याला एक लाख रुपये देण्यात आले होते. ते पैसे ऐय्याशीवर खर्च केल्याचे सांगितले. दोन मुलींवर हे पैसे उधळले. इंडियन मुजाहिदीनच्या विचारधारेशी काहीही घेणेदेणे नसल्याचे त्याने चौकशीत सांगितले होते. दहशतवाद पसरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविण्यात येतो. त्यातून केवळ ऐश करावी, एवढाच हेतू असल्याचे समोर आले आहे. सिद्दीकीची येरवडा तुरुंगातच हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर २०१० मध्ये बंगळुरु येथे झालेल्या स्फोटाच्या कटात सहभाग असल्याचा आरोप होता.
जर्मन बेकरी स्फोटाचा प्रमुख आरोपी यासीन भटकल यानेही टेरर फंडचा स्वतःसाठी वापर केला. इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांना कायदेशीर मदत पुरविण्यासाठी त्याला १४ लाख रुपये देण्यात आले होते. परंतु, त्याने तो पैसा नालासोपारा येथील एका बांधकाम प्रकल्पात गुंतविले. भटकलला बांधकाम व्यवसायात प्रवेश करायचा आहे, असे अटकेत असलेल्या काही जणांनी सांगितले.