सिरीयात स्फोटात ३० लोक ठार

सिरीयाची राजधानी दमासकसमध्ये दोन आत्मघातकी कार बॉम्ब स्फोटात ३० जण ठार झाले आहेत. सुरक्षा आणि गुप्तचर मुख्यालयं ही या हल्ल्याचे लक्ष्य होती असं सिरीयन सरकारी सूत्रांनी सांगितलं. अरब लीगचे पथक दाखल होण्याच्या एक दिवस अगोदर हे स्फोट घडवण्यात आले.

Updated: Dec 23, 2011, 07:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

सिरीयाची राजधानी दमासकसमध्ये दोन आत्मघातकी कार बॉम्ब स्फोटात ३० जण ठार झाले आहेत. सुरक्षा आणि गुप्तचर मुख्यालयं ही या हल्ल्याचे लक्ष्य होती असं सिरीयन सरकारी सूत्रांनी सांगितलं. अरब लीगचे पथक दाखल होण्याच्या एक दिवस अगोदर हे स्फोट घडवण्यात आले. सिरीयात गेली काही महिने राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांच्या विरोधात तीव्र आंदोलन पेटलं आहे. सरकारने आंदोलकांवर केलेल्या बळाच्या वापरात अनेकांना जीव गमावावा लागला आहे.

 

सिरीयाने आंदोलकांवरची कारवाई थांबवण्याचं आश्वासन अरब लीगला दिलं होतं त्यासंदर्भात लीगचं पथक सिरीयाला भेट देणार आहे. स्फोटानंतर सिरीयातील उठाव हा दहशतवाद्यांचे कारस्थान असल्याचं आणि त्याला जनतेचं पाठबळ नसल्याचा दावा योग्य असल्याचं सरकारी अधिकारी म्हणाले. सिरीयात मार्च महिन्यापासून लोकशाही आंदोलनाला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच आत्मघाती स्फोट घडवण्यात आले आहेत. सिरीयाचे उप परराष्ट्र मंत्री फैसल मेकदाद म्हणाले की आम्ही सुरवाती पासूनच हा दहशतवाद असल्याचं सांगत होतो. नागरिक आणि सेनादलांना लक्ष्य करण्यात येत होतं. स्टेट टीव्हीने या स्फोटात अल कायदाचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अरब लीगचे निरीक्षक येण्याच्या आधी सिरीयन सरकारने आंदोलकांवर कडक कारवाई आणि मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर केला आहे. गेल्या आठवड्यात सिरीयात २०० लोकांचा मृत्यु झाला. तर मार्च महिन्यापासून जवळपास ५००० लोकं मृत्युमुखी पडले आहेत.