www.24taas.com, जिनेव्हा
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.
आयएलओचे महासंचालक जुआन सोमाविया यांनी जागतिक रोजगाराचा मार्ग ,२०१२ या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सरकारने सगळे प्रयत्न करूनही बेकारीचं संकट काही टळलेलं नाही. जगभरातल्या दर ३ जणांमागे १ नोकरदार किंवा सरासरी १.१ अब्ज लोक बेरोजगार आहेत. किंवा गरीबीत जीवन ढकलत आहेत.
खरंतर अर्थव्यवस्थेमध्ये नव्या रोजगार संधी निर्माण करणं ही आपली आत्ताची प्रमुख गरज आहे. पण, याला प्राधान्य दिलं जात नाही.असं सोमाविया म्हणाले. सर्व देशांच्या सरकारांनी एकमेकांच्या सहकार्याने गुंतवणुकीला बाधक ठरणाऱ्या भीती आणि अनिश्चिततेला दूर करायला हवं. तरच खाजगी क्षेत्रात जागतिक स्तरावर रोजगार वाढेल. आयएलओच्या अहवालानुसार २०११ मध्ये १५ ते २४ वर्षं वयोगटातले ७.४८ कोटी तरुण बेरोजगार होते. २००७ नंतर यांमध्ये ४० लाख बेरोजगारांची वाढ झाली आहे.