सिंगापूर: एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
एअर एशियाचे बेपत्ता झालेल्या QZ8501 या विमानाचा ठावठिकाणा शोधण्याची मोहीम आज पुन्हा सुरू झाली. इंडोनेशियातील बेलितुंग बेटांच्या पूर्व आणि उत्तर भागांतील समुद्राच्या तळाशी शोध घेण्यावर आमचा भर आहे, असं इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
पूर्व जावा इथल्या सुराबया शहराच्या विमानतळावरून काल पहाटे साडेपाच वाजता एअर एशियाच्या या विमानानं उड्डाण केलं. सिंगापूरच्या चांगी विमानतळावर तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता हे विमान पोचणं अपेक्षित होतं.
हवाई दलाचे विमान, नौदलाची जहाजे आणि इंडोनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातील अधिकारी या शोध मोहिमेत सहभागी झाले असल्याचं इथल्या माध्यमांनी म्हटलं आहे.
या विमानात भारतीय प्रवासी नव्हते. त्यामध्ये ब्रिटिश, मलेशियन, सिंगापुरी, दक्षिण कोरियन, इंडोनेशियन प्रवाशांसह सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.