www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
दहशतवादी संघटना अल कायदा नवी टीम तयार करण्याच्या कामाला लागलंय. धक्कादायक बाब म्हणजे फक्त पाच ते आठ वर्षांच्या मुलांना यामध्ये ट्रेनिंग दिलं जातंय. पाहुयात हा खळबळजनक रिपोर्ट.
हे दृश्य पाहून एखाद्या शाळेत नेमबाजीचा सराव सुरू आहे, असं वाटावं. छोट्या छोट्या मुलांच्या हातात या खोट्या बंदुका दिल्यायत आणि एखादा नेमबाजीचा खेळ सुरू आहे, असा समज सहज होतो..... पण निरखून पाहिलंत तर एका धक्कादायक वास्तव दिसेल.
एका चिमुरड्यांच्या हातात आहेत AK 47. आणि ही सगळी मुलं दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतायत.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानाच्या सीमावर असलेल्या उत्तर वजिरीस्तानमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे.
दहशतवादाचं ट्रेनिंग घेणारी ही मुलं पाच ते आठ वर्षांच्या वयोगटातली आहेत. या छोट्या छोट्या हातांमध्ये या बंदुका नीट मावतही नाहीयत. पण दहशतवादाची फॅक्टरी चालवण्याचा ठेका घेतलेल्यांना त्याची परवा नाही. फक्त आत्मघातकी हल्लेखोर तयार करायचे, त्यांच्या मनात फक्त दहशतवाद भरवायचा आणि रक्ताची होळी खेळायला त्यांना तयार करायचं, एवढंच त्यांचा उद्देश.
अमिरेकेतलं बोस्टन शहर काही दिवसांपूर्वीच बॉम्बस्फोटानं हादरलं होतं. या बॉम्बस्फोटाप्रकरणी ज्याला पकडण्यात आलं, त्यानंही अल कायदाकडून बॉम्ब तयार करण्याचं ट्रेनिंग घेतल्याची कबुली दिलीय. दहशतवाद म्हणजे काय हे ज्यांना माहीतही नाही, आत्मघातकी हल्ला म्हणजे काय ते समजतही नाही, इतक्या लहान वयात त्यांच्या हातात बंदुक ठेवली गेलीय. आता भविष्यात काय वाढून ठेवलंय. त्याचा अंदाज घ्यायला ही दृश्यं नक्कीच पुरेशी आहेत.