मलीना : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना फिलिपिन्सच्या अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांनी सर्वांसमोर चक्क शिवी हासडली आहे. दरम्यान, अपशब्द वापरल्यानंतर रॉड्रिगो यांच्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी माफी मागत अपशब्द वापरल्याबद्दल खेद व्यक्त केला.
रॉड्रिगो यांनी बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली. त्यांच्या या वक्तव्यामुळे व्हाईट हाऊसने लाओस येथे बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली. व्हाईट हाऊसने काही दिवसांपूर्वी बराक ओबामा फिलिपिन्समध्ये ड्रग्ज तस्करांना ज्याप्रकारे हाताळले जात आहे त्यासंबंधी अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितलं होते.
ओबामा ड्रग तस्करांना देण्यात येणाऱ्या मृत्यूदंडांवरही चर्चा करणार होते. मात्र यामुळे संतापलेल्या रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांवर आगपाखड करत खालच्या स्तरावर उतरत शिवी घालून संताप व्यक्त केला होता. 'ओबामांना काय वाटतं, कोण आहेत ते? मी अमेरिकेच्या हातचं बाहुले नाही. मी एका स्वतंत्र देशाचा अध्यक्ष असून मी फक्त फिलिपिन्स जनतेला उत्तर देण्यास बांधिल आहे', असं वक्तव्य रॉड्रिगो डुटर्टे यांनी होते.
रॉड्रिगो 30 जून रोजी फिलिपिन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत. सत्तेवर येताच त्यांनी एक लाख ड्रग्ज तस्करांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड देणार असल्याची घोषणा केली. हे वचन पूर्ण करण्यासाठी डुटर्टे यांनी आतापर्यंत 2400 जणांना मृत्यूदंड दिला आहे.