लखनौ, उत्तर प्रदेश : नेपाळ सीमेवरून पुन्हा एकदा मानवी तस्करीची बातमी समोर येतेय. नेपाळमध्ये २५ एप्रिलला आलेल्या भूकंपानंतर तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाहीये. त्यामुळे नोकरीचं आमिष दाखवून तिथल्या अल्पवयीन मुलांना भारतात विकलं जातंय.
मेल टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी मुलांना भारतातील मोठ्या शहरांमध्ये मजूरी आणि वेश्याव्यवसायासाठी विकलं जातंय. उत्तर प्रदेश गुप्तचर संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७ मानवी तस्करांनी गेल्या दीड महिन्यात सुमारे ५०० मुलांना भारतात आणून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये विकलंय.
एका गुप्तचर अधिकाऱ्यानं सांगितलंय, 'सर्वाधिक मानवी तस्करीच्या घटना उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये घडताहेत. बहराईचपासून नेपाळ आणि उत्तर प्रदेशची सीमा जवळपास ११० किलोमीटरपर्यंत खुली आहे. पोलिसांच्या भीतीनं बरेच दिवस ही तस्करी बंद होती, पण नेपाळमधील भूकंपानंतर तस्कर पुन्हा सक्रीय झालेत.'
'हे मानवी तस्कर नोकरीचं आमिष दाखवून लहान मुलांच्या परिवाराशी सौदा करून भारतात आणतात. तस्कर भूकंपग्रस्तांसाठी भारतात सरकारनं विविध योजना सुरू केल्याचं सांगून फसवणूक करत आहेत' असंही त्या अधिकाऱ्यानं सांगितलंय.