सँटिआगो : दक्षिण अमेरिकेच्या चिलीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका ९० वर्षीय महिलेच्या पोटात ५० वर्षांचा भ्रूण असल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारच्या भ्रूणाला स्टोन बेबी म्हणतात.
या महिलेलाही माहित नव्हतं की तिच्या गर्भात स्टोन बेबी आहे. ही महिला पडल्याने जखमी झाली. उपचार करण्यासाठी ती रुग्णालयात गेली आणि तिथे तिचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रेचा रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. महिलेच्या गर्भात ५० वर्षांचा सुमारे दोन किलो वजनाचा एका मृतावस्थेतील भ्रूण होता.
असा प्रकार फारच दुर्मिळ असतो. कोट्यावधीमधून एखाद्या बाबतीत होत असतो. याला लिथोपेडियॉन म्हटलं जातं, ज्यात भ्रूण कॅल्सिफाईड होतं. भ्रूणाची वाढ गर्भाबाहेर झाल्याने अशी परिस्थित उद्भवते. गर्भाबाहेर वाढ झाल्याने भ्रूणाला पोषण मिळत नाही, त्यामुळे ते मरतं. अशा भ्रूणाला स्टोन बेबी म्हणतात.
हे एक दुर्मिळ प्रकरण असल्याचे रुग्णालयाचे संचालक मार्को वार्गास लाजो यांनी सांगितले. डॉक्टरांच्या मते महिलेचं वय जास्त आहे, त्यामुळे ऑपरेशन करुन भ्रूण बाहेर काढणं तिच्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे ऑपरेशन न करताच तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
यापूर्वी नागपूरमध्येही एका ६४ वर्षीय महिलेच्या पोटात ३६ वर्षीय बालकाचा सांगाडा सापडला होता. तसेच ब्राझिलमधील एका महिलेच्या पोटातही 44 वर्षांचा स्टोन बेबी सापडला होता.
जगात आतापर्यंत केवळ ३०० प्रकरणं समोर आली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.