देवयानी प्रकरण : भारताने अमेरिकेवर लादले निर्बंध

भारतीय राजदुतातील वरिष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिल्याने भारताने तीव्र आक्षेप घेतला. अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताने अमेरिकेवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 8, 2014, 05:35 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय राजदुतातील वरिष्ठ अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिल्याने भारताने तीव्र आक्षेप घेतला. अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारताने अमेरिकेवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्लीतील अमेरिकी दुतावासाच्या क्षेत्रात करण्यात येणाऱ्या खासगी कार्यक्रमांवर बंदी घालत, दुतावासातील कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्याही वाहतूक नियमांनुसार चालविण्यात याव्यात, असे भारताने अमेरिकन दुतावासाला कळविले आहे.
देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी अमेरिकेत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने भारताकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. दुतावासाच्या भागात असलेली रेस्टॉरंट, स्वीमिंग पूल आणि टेनिस कोर्ट १६ जानेवारीपासून बंद करण्यात यावीत, असे स्पष्ट भारताने अमेरिकी दुतावासाला सांगितले आहे.
व्हिएन्ना करारानुसार इतर भागातही अमेरिकी दुतावासातील अधिकारी हे सर्व करू शकत नाहीत. तसेच दुतावासातील राजदूत व अधिकारी वापरत असलेल्या गाड्यांनी स्थानिक वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यापूर्वी भारताने अमेरिकी दुतावासाच्या भागातील सर्व अडथळे हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.