www.24taas.com, झी मीडिया, सोल
दक्षिण कोरियाच्या दक्षिण समुद्रात एका जहाजाला जलसमाधी मिळाली. यात 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 55 जण जखमी झालेत. तर जवळपास 300 लोक बेपत्ता असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. या जहाजातून 459 लोक प्रवास करीत होते. यामध्ये सर्वाधिक शालेय विद्यार्थी होते. एका बेटावर सुट्टी घालविण्यासाठी हे प्रवासी जात होते.
1993नंतर दक्षिण कोरियातील ही मोठी दुर्घटना आहे. 1993मध्ये अशाच एका दुर्घटनेत 292 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, या जहाजातील लिम हुंग मिन नावाचा विद्यार्थी वाचला. त्याने समुद्रात पडल्यानंतर पोहत एका जहाजापर्यंत पोहचला आणि त्यानंतर किनारा गाठला. त्यांने सांगितले की, जहाज एकाच दिशेने झुकले. त्यामुळे आम्ही एकमेकांवर आदळलो. एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. काहींच्या शरीरातून रक्त सांडत होते. पोहत असताना जाणवले की, समुद्राचे पाणी खूपच थंड होते.
जहाजाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर, सुरक्षा दलाची मदत घेतली जात आहे. जहाजाचे 30 सदस्य, 325 विद्यार्थी आणि 15 शिक्षक तर अन्य 89 प्रवासी या जहाजावर होते, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 164 जणांसा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी जहाजावरुन आपात्कालीन संदेश पाठविण्यात आला आहे. या दुर्घटनेचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. किती जणांना जलसमाधी मिळाली आहे, याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांचा वाचविण्यासाठी प्राधान्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.