अनेक वर्षं झालं होतं माझं लैंगिक शोषण- अनुष्का शंकर

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जगाचा निरोप घेणाऱ्या जगप्रसिद्ध सितारवादक रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्यावर अनेक वर्षं लैंगिक शोषण झाल्याचं अनुष्का शंकर हिने सांगितलं. ३१ वर्षीय सितारवादक अनुष्काने व्हॅलेंटाइन्स डे निमित्त अरब महिलांना घराबाहेर पडण्याचा संदेश दिला. हा संदेश देताना अनुष्काने वरील खुलासा केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2013, 04:37 PM IST

www.24taas.com नवी दिल्ली
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जगाचा निरोप घेणाऱ्या जगप्रसिद्ध सितारवादक रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्यावर अनेक वर्षं लैंगिक शोषण झाल्याचं अनुष्का शंकर हिने सांगितलं. ३१ वर्षीय सितारवादक अनुष्काने व्हॅलेंटाइन्स डे निमित्त अरब महिलांना घराबाहेर पडण्याचा संदेश दिला. हा संदेश देताना अनुष्काने वरील खुलासा केला आहे.
व्हॅलेंटाइन डे निमित्त एका वेबसाइटवर व्हिडिओ संदेश देताना अनुष्का शंकरने आपल्यावर लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल प्रथमच माहिती दिली. आपल्यावर अनेक वर्षं झालेल्या बलात्काराबद्दल तिने या व्हिडिओत सांगितलं. लहानपणी आपलं अनेक वर्षं लैंगिक शोषण होत होतं. माझ्या आई-वडिलांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्तीने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. शिवीगाळ, शिशारी आणणारे स्पर्श यांसारख्या गोष्टी मी अनेक वर्षं सोसत होते. या गोष्टींचा सामना कसा करावा, हे मला समजत नव्हतं, असं अनुष्का शंकरने म्हटलं.
अजूनही मला त्या वेदना जाणवतात, ते स्पर्श आठवून मला भीती वाटते, असं अनुष्काने आपला अनुभव सांगताना म्हटलं. आजही रात्री एखाद्या पुरुषाने मला वेळ विचारली, तर उत्तर द्यायची मला भीती वाटते, असं अनुष्का म्हणाली. आता अत्याचार होणाऱ्या महिलांसाठी मी जगत आहे, असं अनुष्का म्हणाली. दिल्ली गँगरेपसारख्या प्रकारांची अनुष्काने टीका केली. स्त्रियांनी आता बाहेर पडावं. माझी साथ देत मुक्तपणे नाचावं. या नाचात वेदना भुलवण्याची शक्ती असल्याचं अनुष्का शंकर म्हणाली.