तेगुसीगल्पा : 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत जिंकण्याचं तिचं स्वप्न होतं... पण, तिचं हे स्वप्न पूर्ण होणार त्याआधीच तिचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय.
अपहरणानंतर मिस होंडुरास मारिया आणि तिच्या बहिणीची हत्या झाल्याचं आता उघड झालंय. या दोन्ही बहिणी १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी बाहेर पडलेल्या असताना या दोघींचं अपहरण झालं होतं.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तेगुसीगल्पाहून १८० किलोमीटर दूर सांता बारबराच्या एका नदीनजिक मारिया आणि तिची बहिण सोफिया यांचे मृतदेह सापडलेत. हत्येनंतर त्यांचे मृतदेह जमिनीखाली गाडण्यात आले होते.
१९ वर्षीय मारिया जोस अल्वाराडो गुरुवारी सुरू होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्यासाठी लंडनला रवाना होणार होती. तिला १३ नोव्हेंबर रोजी पार्टीनंतर सांता बारबरा शहराजनिकच्या एका रिसॉर्टहून एका बिना नंबरच्या गाडीतून जाताना शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर त्यांचा जगाशी संपर्क तुटला.
पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारं आणि या दोन्ही बहिणींचे मृतदेह घेऊन जाणाऱ्या गाड्याही ताब्यात घेतल्यात.
पोलिसांना, मारियाची बहिण सोफिया हिचा प्रियकर प्लूटार्को रुज याचा या हत्येत हात असल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी त्याला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, रुजनं आपला गुन्हा कबूल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.