नवी दिल्ली : छुप्या पद्धतीनं कॅमेरा लावून अश्लील चित्रिकरण करणाऱ्या एका मूळ भारतीयाला लंडनमध्ये अटक करण्यात आलीय.
भारताला मान खाली घालायला लावणाऱ्या या विकृत व्यक्तीचं नाव जॉर्ज थॉमस आहे. तो ३८ वर्षांचा आहे. जॉर्ज 'अर्नेस्ट अॅन्ड यंग' या कंपनीत काम करत होता. आपल्या कामाच्या ठिकाणी त्यानं शॉवर, टॉयलेट आणि इतर ठिकाणी छुपे कॅमेरे लावल्याचं उघड झालंय.
ऑफिसमध्ये एका महिला सहकाऱ्याला शॉवर रुममध्ये छुप्या पद्धतीनं लावलेला कॅमेरा आढळल्यानंतर त्याचं हे बिंग फुटलं. त्यानंतर पोलिसांनी तपासणी घेतल्यानंतर जॉर्जकडे आढळलेल्या मेमरी कार्डमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळले.
थॉमस हा विवाहीत असून त्याला एक अपत्यही आहे. त्याच्यावर ३,५०० हून अधिक अश्लील व्हिडिओ छुप्या पद्धतीनं चित्रित केल्याचा आरोप आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू होता.