तेहरान: पुरुषांची व्हॉलिबॉलची मॅच बघितल्यानं तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त असून ब्रिटननंही त्या तरुणीला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी इराणकडे केली आहे.
तेहरानमध्ये महिलांनी पुरुषांचे व्हॉलिबॉल सामने बघू नये असा अजब नियम आहे. याचा विरोध दर्शवण्यासाठी मूळची ब्रिटीश पण सध्या इराणमध्ये राहणारी गॉनचे गवामी ही २५ वर्षाची तरुणी आणि अन्य काही महिला २० जूनरोजी व्हॉलिबॉल सामना बघायला गेल्या. यानंतर पोलिसांनी सर्व महिलांना तिथून बाहेर काढलं. काही दिवसांनी गवामीला पोलिसांनी अटक केली आणि तिला तुरुंगात डांबलं. गवामी ही स्वतः वकिलही आहे. तेहरानमधील न्यायालयानं नुकताच गवामीविषयी निकाल दिला असून यात तिला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी यंत्रणेविरोधात काम केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
गवामीच्या शिक्षेविरोधात इराणमधील महिला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. गवामीला तुरुंगातून सोडून द्यावं अन्यथा युरोपियन महासंघामध्ये इराणच्या प्रतिमेला धक्का बसेल असं डेव्हीड कॅमेरुन यांनी म्हटलं आहे. तर इराणनं या वृत्ताचं खंडन केलं. गवामीला अन्य कारणांसाठी शिक्षा झाल्याचं इराणमधील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र शिक्षेचं कारण काय याचं उत्तर देणं त्यांनी टाळलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.