रोम : युरोपचा समृद्ध इतिहास लाभलेल्या रोम शहरात सध्या गदारोळ माजलाय. याचं कारण म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या हसन रुहानींचे दौरा... या दौऱ्यानिमित्ताने रोममधील एका वास्तुसंग्रहालयातील प्राचीन नग्न पुतळ्यांना झाकल्याचे काही फोटो इंटरनेटवर वायरल झालेत.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इटलीसोबत १९ अब्ज डॉलर्सचे करार करण्यासाठी नुकतेच इटलीत दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी रोम शहरातील कॅपिटोलीन वास्तुसंग्रहालयाला भेट दिली.
इटलीचे पंतप्रधान मॅटेओ रेंझी यांना या भेटीच्या आधी रुहानी यांच्या कार्यालयातर्फे इराणमध्ये नग्नता मान्यता नसल्याने योग्य ती काळजी घेण्याची विनंतीवजा सूचना करण्यात आली होता.
दरम्यान रूहानी आणि रेंझी यांनी ज्या खोलीत चर्चा केली त्या खोलीत राजा मार्कस ऑरेलियसचा पूर्ण कपडे घातलेला पुतळाच असल्याचीही काळजी घेण्यात आली होती. रुहानी ज्या मार्गावरून गेले तेथील सर्व नग्न पुतळे नखशिखान्त झाकले गेले होते.
दरम्यान इटलीतील डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारधारेच्या लोकांनी तसेच राजकारण्यांनी रेंझी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्याच्या संस्कृतीचा आदर करणे म्हणजे आपल्या संस्कृतीला कमी मानून आपल्याच लोकांचा अवमान करणे होत नाही, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.
रुहानी इटलीतून फ्रान्सला जाणार आहेत. तिथे राष्ट्रपतींच्या दरबारात हलाल मांसाचा भोजनात वापर करण्यासोबत, वाईन न देण्याच्या विनंतीला फ्रेंच सरकारने नकार दिल्याने रुहानी यांच्या कार्यालयातर्फे भोजनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे, असंही म्हटलं जातंय.