www.24taas.com, झी मीडिया, कॅनडा
ध्रुवीय वादळाच्या तडाख्यामुळं निम्मी अमेरिका बर्फमय झालीय. उत्तर अमेरिकेत कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मोंटाना राज्यात तर उणे ५२ अंश इतके तापमान नोंदवलं गेलंय. शतकातलं सर्वात थंड तापमान म्हणून हे नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.
शिकागो शहरही थंडीमुळं गोठलं असून शहरात उणे २७ अंश तर इंडियाना पोलीस राज्यातल्या फोर्ट वायनेमध्ये उणे २५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. अमेरिकेतल्या १८ कोटी नागरिकांचा याचा फटका बसला असून यामुळं हजारो विमानांची उड्डाण रद्द करण्यात आलीत.
ध्रुवीय थंडी म्हणजेच पोलर व्होर्टेक्सच्या तडाख्यानं उत्तर अमेरिकेत हे हिमयुग अवतरलंय. ध्रुवीय वादळ आता मध्य अमेरिकेच्या दिशेनं सरकू लागलंय. त्यामुळं कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या थंडीत चौघांचा मृत्यू झालाय. ध्रुवीय वादळाचा फटका १८ कोटी नागरिकांना बसला आहे. लोकांनी घराबाहेर पडूच नये, काळजी न घेतल्यास कोणाचाही दहा मिनिटांत मृत्यू होऊ शकतो एवढी गंभीर परिस्थिती असल्याचं इंडियानापोलिसचे महापौर ग्रेग बॅलार्ड यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, बेघरांना आसरा मिळावा यासाठी संबंधित राज्य सरकारांनी हंगामी निवाऱ्याची व्यवस्था निर्माण केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.