गद्दाफीला पुतिनशी असंही नातं जोडायची इच्छा होती...

लीबियाचा दिवंगत हुकुमशाह मुअम्मार गद्दाफी याच्या माजी सल्लागारांनी एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन यांच्या एका मुलीसोबत आपल्या दुसऱ्या मुलाचा विवाह करण्याची गद्दाफींची इच्छा होती, असं त्यांनी उघड केलंय. 

Updated: Jan 2, 2016, 12:49 PM IST
गद्दाफीला पुतिनशी असंही नातं जोडायची इच्छा होती...  title=

त्रिपोली : लीबियाचा दिवंगत हुकुमशाह मुअम्मार गद्दाफी याच्या माजी सल्लागारांनी एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन यांच्या एका मुलीसोबत आपल्या दुसऱ्या मुलाचा विवाह करण्याची गद्दाफींची इच्छा होती, असं त्यांनी उघड केलंय. 

अल हौनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लीबिया आणि रशियाचे संबंध आणखीन मजबूत करण्यासाठी गद्दाफी यांना हा मार्ग सुचला होता. आपला दुसरा मुलगा सैफ- अल - इस्लाम गद्दाफी याच्यासाठी पुतीन यांच्या मुलीचा हात मागणारा प्रस्ताव गद्दाफींनी पाठवला होता. 

गद्दाफी यांनी याबद्दल स्वत: पुतीन यांच्याशी बोलणं केलं होतं... आणि आपल्या मुलाला जावई बनवण्याचा प्रस्तावही त्यांच्यासमोर मांडला होता. 


गद्दफींचा मुलगा... सैफ अल इस्लाम

पुतीन यांनी मात्र आपली मुलगी सैफ- अल - इस्लाम याला ओळखत नसल्याचं सांगत यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. 

गद्दाफी यांना नंतर पदच्यूत करून २०११ मध्ये नाटोच्या समर्थनार्थ झालेल्या विद्रोहात ठार करण्यात आलं होतं. यानंतर जुलै महिन्यात त्यांच्या मुलाला - सैफ अल इस्लामला त्रिपोलीच्या न्यायालयानं देहदंडाची शिक्षा दिली होती. 

सैफला २०११ च्या विद्रोहानंतर लीबियातून पळण्याच्या प्रयत्नात पकडण्यात आलं होतं. तेव्हापासून तो जिंतान शहरात अटकेत आहेत. सैफला पकडणाऱ्या इस्लामी कट्टरपंथी मिलीशियानं सैफला सेनेच्या ताब्यात द्यायला नकार दिलाय.