www.24taas.com, ओसलो
वागणूक सुधारली नाही तर भारतात परत पाठवण्याची धमकी आपल्या मुलाला देणाऱ्या भारतीय दांपत्यास नॉर्वे येथील कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुलाच्या वडिलांना १८ महिन्यांची तर आईला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
स्कूल बसमधून येताना चड्डी ओली करण्याची सवय चंद्रशेखर वल्लभनेणी यांच्या मुलाला होती. तसेच तो शाळेतून येताना खेळणी बरोबर घेऊन यायचा. या चुकीच्या वर्तणुकीला चाप बसावा म्हणून चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी अनुपमा यांनी आपल्या मुलाला दमदाटी केली तसेच न सुधारल्यास भारतात पाठविण्याची धमकी दिली होती. ही बाब शाळा व्यवस्थापनाला समजल्यानंतर मूळच्या आंध्रप्रदेशातील असलेल्या या दांपत्याविरोधात मुलांना धमकी देणे आणि मारहाण करणे असे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याची शिक्षा म्हणून या दांपत्याला किमान सव्वा वर्षाच्या कारावासाची मागणी पोलीसांनी केली होती. या मुलाच्या शरीरावर भाजल्याचे डाग असून, त्याला पट्टय़ाने मारल्याच्या खुणा आहेत. हे दोघे पुरावा नष्ट करून भारतात निघून जातील आणि तिथे जाऊन मुलावर पुन्हा अत्याचार करतील, अशी भीती असल्याने आम्ही त्यांना अटक केली असल्याचे ओसलो पोलिस खात्याचे प्रमुख चौकशी अधिकारी कुर्ट लीर यांनी सांगितले.
मंगळवारी या खटल्याचा निकाल लागला असून चंद्रशेखर व अनुपमा या दांपत्याला दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.