न्यूयॉर्क : काबुलमध्ये ट्रकमध्ये झालेल्या स्फोट तर कंधारमध्ये आत्मघातकी अतिरेक्यांचा खात्मा, अमेरिकेचा लष्कर-ए-तोयबाला इशारा आदी बातम्या आता एका क्लिकवर वाचता येणार आहे.
१. लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी नेटवर्कसारख्या अतिरेकी संघटनांबाबत पाकिस्ताननं आपला दृष्टीकोन बदलावा असा सल्ला अमेरिकेनं दिलाय. या संघटनांवर कडक कारवाई करावी, असंही अमेरिकेनं म्हटलंय.
------
२. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात ८ जण ठार तर १२५ जण जखमी झालेत. स्फोटकांनी भरलेला एक ट्रक सैन्याच्या एका तळाजवळ धडकवण्यात आला.
------
३. दुसरीकडे कंधारमध्ये ५ आत्मघातकी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. या अतिरेक्यांनी लष्कराच्या दोन ठाण्यांवर हल्ला केला होता. यात एक अधिकारी आणि दोन जवानही मारले गेलेत.
------
४. सौदी अरेबियामधल्या आभा शहरात एका मशिदीत झालेल्या स्फोटात १५ जण ठार झालेत. यामध्ये स्पेशल इमर्जन्सी फोर्सचे अधिकारी आणि जवानांची संख्या जास्त आहे.
------
५. दक्षिण गाझामध्ये चार पॅलेस्टिनी नागरिकांचा स्फोटात बळी गेलाय. तर ३० जण जखमी झालेत. हा स्फोट इस्त्रायलनं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे झाल्याचा दावा पॅलेस्टाईननं केलाय. गेल्या वर्षी हे मिसाईल डागलं गेलं होतं, पण त्याचा स्फोट झाला नव्हता.
-------
६. व्हेनेझुएलामध्ये एका सूपरमार्केटमध्ये झालेल्या लुटमारीचा व्हिडिओ समोर आलाय. ही लुटालूट रोखण्याचा प्रयत्न करताना एकाचा बळी गेलाय. तर ६० आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलामध्ये हे लुटमारीचे प्रकार वाढीला लागलेत.
-------
७. अमेरिकेत कोलोरॅडोमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी तिथं एक व्यक्ती हजर असल्याचं सांगितलं जातंय. मात्र बचाव पथक तिथपर्यंत पोहोचू शकलेलं नाही.
-------
८. जर्मनीमध्ये सध्या उष्म्यानं कहर मांडलाय. पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. युरोपमध्ये इतकं तापमान हे आगीत पडल्यासारखंच आहे. त्यामुळे स्वीमिंग पूल आणि नद्यांमध्ये डुबक्या मारून लोक उष्णतेचा सामना करतायेत.
-------
९. ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खास नाणी आणि पोस्टाची तिकिटं छापण्यात आलेत. रिओ दी जनेरोमध्ये एका वर्षानंतर क्रीडाक्षेत्राचा हा महाकुंभ भरणार आहे.
--------
१०. पेरुग्वेमध्ये मॅरेथॉन फॅशन शोच्या माध्यमातून नवा विक्रम प्रस्थापित केलाय. राजधानी लीमामध्ये ३० तास चाललेल्या या फॅशन शोनं मियामीमधल्या २४ तासांच्या शोचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.