www.24taas.com, रियाद, सौदी अरेबिया
आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा चर्चेत राहणारा सौदी अरेबियाचा कडक कायदा यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हा कायदा आणखी एक तरुणाचा जीव घ्यायला सज्ज झालाय.
अली अल ख्वाहीर नावाच्या या युवकानं दहा वर्षांपूर्वी आपल्याच मित्रावर चाकूनं हल्ला केला होता. यावेळी त्याच्या मित्राच्या पाठिचं हाड कापलं गेलं होतं आणि त्याला लखवा झाला. या आरोपाखाली अलीलाही शिक्षा मिळालीय. ही शिक्षा म्हणजे, अलीचंही माकडहाड कापलं जावं ज्यामुळे तोही आपल्या मित्राप्रमाणेच लखवाग्रस्त होईल.
पश्चिमेकडील ताबुक प्रांतात राहणारा अली केवळ १४ वर्षांचा होता. नकळत्या वयातच त्यानं आपल्या मित्रावर चाकूनं हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याचा २२ वर्षीय मित्र अब्दुल अजीज अल मुतैरी याला लखवा झाला. दोन वर्षांपूर्वी त्याचा एक पायही कापावा लागलाय. मित्रावर हल्ला करणाऱ्या अलीला दहा वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती. पण जेव्हा त्याच्या मित्राच्या कुटुंबियांनी ‘खून के बदले खून’ अशी मागणी केली तेव्हा इस्लामी कायद्यानुसार शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याला दोन लाख सौदी रियाल भरपाई देण्यास सांगितलं गेलं होतं.