युक्रेनमध्ये `बोलणी` फिस्कटली, हिंसाचारात ७० ठार

रशिया सर्मथक सरकारविरोधात सुरू झालेल्या युक्रेनमधील आंदोलनाचा भडका उडाला. युक्रेनमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत ७० जण ठार झालेत तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 20, 2014, 11:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, किव
रशिया सर्मथक सरकारविरोधात सुरू झालेल्या युक्रेनमधील आंदोलनाचा भडका उडाला. युक्रेनमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत ७० जण ठार झालेत तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.
ऐतिहासिक इंडिपेंडन्स चौकात ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांना हुसकावण्यासाठी पोलीस जाताच निदर्शकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून सरकारी इमारत पेटवून दिली. त्यामुळे हिंसाचाराचा आगडोंब उडाला.
युरोपियन समुदायातील तीन राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री यांनी राष्ट्राध्यक्ष यानुकोविच आणि विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली. पण युक्रेनमधल्या हिंसाचारामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. युक्रेनमध्ये समझोत्याची बोलणी फिस्कटल्यामुळे पुन्हा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते यांच्यात तह होण्याविषयी चर्चा होणार होती. मात्र, युक्रेन सरकार विरोधात असंतोषाचा भडका उडाला आहे.
सोव्हिएत ब्लॅकमधील सर्वात मोठं राज्य असलेल्या युक्रेनने युरोपियन समुदायाशी भागीदारी न करण्याचा निर्णय हा रशियाचा दबावामुळे घेतल्याचं समुदायाचे म्हणणं आहे. रशियाची युक्रेनवर पकड कायम ठेवण्याच्या धोरणामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. एकेकाळी सोव्हिएत रशियाचा नियंत्रणाखाली असलेल्या पोलंडची भरभराट पश्चिम युरोपबरोबर संबंधांतील सुधारणांमुळे झाली आहे.
पश्चिम युरोपातील राष्ट्रांच्या राजकारणातील आदर्शांचा, सुप्रशासन आणि मानवी हक्कांचा कित्ता गिरवण्यात युक्रेनचे सरकार कमी पडलं आहे. आणि त्यामुळेच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार निर्देशांकानुसार जगातील १७७ देशांच्या क्रमवारीत युक्रेनचा क्रमांक १४४ आहे. युक्रेन ४५ दशलक्ष लोकसंख्या असलेला देश आहे.
रशिया आणि युरोपियन समुदायला विभागणारं सर्वात मोठं सीमेवरील राष्ट्र म्हणजे युक्रेन. युक्रेन ११९१ पर्यंत सोव्हिएत संघराज्याचा भाग होता. पण बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर रशियाचेही विघटन झालं आणि इतर अनेक सोव्हिएत राज्यांप्रमाणेच युक्रेनलाही वास्तव स्वीकारणं भागं पडलं. अमेरिकेच्या पाठिंब्यावर युरोपियन समुदाय सोव्हिएत ब्लॉकमधील देशांशी संबंध दृढ व्हावेत यासाठी गेली दोन दशके प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित व्हावी आणि जीवनमान सुधारावं यासाठी युरोपियन समुदाय प्रयत्नशील आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.