भूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य

भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.

Updated: Sep 7, 2016, 03:58 PM IST
भूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य title=
संग्रहित छाया

रोम : भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.

आणि इटलीच्या कोस्टगार्डला सूचना मिळाली..

भूमध्य सागरात महाकाय लाटा उसळत होत्या. पश्चिम आफ्रिकेतल्या शरणार्थींची एक बोट खवळलेल्या समुद्रात लाटांशी झुंज देत होती. जगण्यासाठी..... जिवंत राहण्यासाठी..... दुसरीकडे इटलीच्या कोस्टगार्डला सूचना मिळाली होती... या सगळ्या शरणार्थींना वाचवायचं होते. कोस्टगार्डची टीम शरणार्थींच्या बोटीपर्यंत पोहोचली.

आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन

बोट खच्चून भरलेली. सगळ्यात आधी तान्ह्या बाळांना वाचवण्यात आले.  इटलीच्या कोस्टगार्डसाठी हे आतापर्यंतचं सगळ्यात आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन होते. अशा मोहीमा कोस्टगार्डसाठी नव्या नाहीत. पण एका रात्रीत अडीच हजार शरणार्थींना वाचवायचं म्हणजे कस लागणार होता.

कोस्टगार्डची टीम नेहमी समुद्रातच फिरत असते. महाकाय अशा भूमध्य समुद्रात शरणार्थींच्या बोटी शोधायच्या आणि त्यांना वाचवायचे, हे त्यांचं रोजचं काम. अशी एखादी बोट दिसल्याची सूचना रडारवर मिळताच कोस्टगार्डच्या जहाजावरच्या सगळ्यांना अलर्ट करण्यात येते. ताबडतोब रेस्क्यू बोट तयार केली जाते आणि क्षणार्धात ती शरणार्थींच्या बोटीच्या दिशेने रवानाही होते. अतिशय कमी क्षमतेच्या बोटीत शेकडो शरणार्थी भरलेले असतात.  

लिबियन कोस्ट गार्डची धाव

शरणार्थींची ही बोट लिबियाच्या किनाऱ्यापासून सात किलोमीटरवर होती. या बोटीवर असलेल्या ब-याच लोकांना स्विमिंग येत नव्हते. काही भाग्यवंतांकडेच लाईफ जॅकेट होते. इटलीची कोस्ट गार्ड टीम रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होते. तेवढ्यात लिबियन कोस्ट गार्डची बोटही तिथे पोहोचते आणि सुरू होतं जॉईण्ट रेस्क्यू ऑपरेशन.

एकेक करुन शरणार्थींना बोटीवर ओढून घेतले जात होते. या बोटीतल्या लोकांची सुटका होते न होते, तोच शरणार्थींची आणखी एक बोट समुद्रात भरकटत असल्याची सूचना मिळते. कोस्टगार्डला नवं टार्गेट मिळते. याही बोटीत शेकडो निर्वासित खच्चून भरलेले. बोटीचा बॅलन्स जरा जरी ढळला, तरी बोटीला जलसमाधी मिळणार, हे नक्की.

आधी लहान बाळांना वाचवण्यात यश

या बोटीवरुनही सगळ्यात आधी लहान बाळांना वाचवण्यात आलं. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलेली बोट दिसताच शरणार्थी वाट्टेल तिथून बोटीवर चढायला लागले आणि ज्याची भीती होती, तेच झालं, त्या गडबडीत आणि धक्काबुक्कीत बोट कलंडली. अनेक जण समुद्रात फेकले गेले. त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमचे जवान समुद्रात उतरले. जेवढ्यांना शक्य झालं, त्यांना खेचून बोटीवर आणण्यात आले. पण आपण समुद्रात बुडतोय, या कल्पनेनंच लोक अक्षरशः अर्धमेल्या अवस्थेत होते.

शरणार्थींची अवस्था फारच बिकट

त्यातच या बोटीचे इंधन समुद्राच्या पाण्यात मिसळतं आणि ते समुद्राचे पाणी नाकातोंडावाटे शरीरात गेले. त्यामुळे शरणार्थींची अवस्था फारच बिकट झाली. त्यांच्यावर ताबडतोब उपचार करावे लागलेत. बोटीवर सुखरुप आलेले आपल्या लोकांना शोधत होते. ज्यांचे आप्तजन मिळाले नाहीत, ते रडत होते. या बोटीवर तर अशीही काही तान्ही बाळं होती, ज्यांचे आई वडील समुद्राच्या पाण्यात बुडाले. मध्यरात्री समुद्रात हे महानाट्य सुरू होते. कोस्टगार्डनं प्रयत्नांची शर्थ केली. पंधरा जण वाहून गेले. पण एका रात्रीत तब्बल 2700 जणांना कोस्टगार्डनं वाचवलं. आणि त्यांची आयुष्य पुन्हा एकदा किनाऱ्याला लागलीत.