लिबियाचा हिंसाचार का घडला?

‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकी चित्रपटात प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून आखाती राष्ट्रांमध्ये मुस्लिमांचा रक्तरंजित हिंसाचार सुरू आहे. लिबियामध्ये तर आगडोंब उसळला असून अमेरिकी दूतावासावर भयंकर हल्ला चढवीत रॉकेटस् डागण्यात आली. त्यात अमेरिकी राजदूत ख्रिस्तोफर स्टिव्हन्स यांच्यासह चार कर्मचारी ठार झाले

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 13, 2012, 04:23 PM IST

www.24taas.com, बेंगाझी / कैरो
‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या अमेरिकी चित्रपटात प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याच्या आरोपावरून आखाती राष्ट्रांमध्ये मुस्लिमांचा रक्तरंजित हिंसाचार सुरू आहे. लिबियामध्ये तर आगडोंब उसळला असून अमेरिकी दूतावासावर भयंकर हल्ला चढवीत रॉकेटस् डागण्यात आली. त्यात अमेरिकी राजदूत ख्रिस्तोफर स्टिव्हन्स यांच्यासह चार कर्मचारी ठार झाले.
‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ हा अमेरिकी चित्रपट मूळच्या इस्रायली व्यक्तीने काढला असून तो अरेबिक भाषेत डबिंग करून यू ट्यूबवर प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये राग व्यक्त करण्यात आला. अमेरिका विरोधी लाट कायम मुस्लिम राष्ट्रांमध्ये आहे.
इजिप्तची राजधानी कैरोमध्येही अमेरिकी दूतावासावर हल्ला चढवून इस्लामी ध्वज फडकविण्यात आले. विशेष म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ‘९/११’च्या हल्ल्याला मंगळवारी ११ वर्षे पूर्ण झाली असताना इस्लामी जगतामध्ये अमेरिकेविरुद्ध हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे.
काही वर्षांपूर्वी डेन्मार्क येथील एका वृत्तपत्राने महंमद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्र छापल्यामुळे जगभरातील मुस्लिमांनी अनेक ठिकाणी हिंसाचार घडविला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता ‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ चित्रपटामुळे झाली आहे. अमेरिकेतील कॉल्टिप ग्रुपने महंमद पैगंबर यांच्यावरील या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद आक्षेपार्ह असल्याचा दावा करीत आखाती देशांत गेले चार दिवस असंतोष खदखदला होता.
मंगळवारी ‘९/११’च्या स्मृतिदिनी लिबियातील मुस्लिम संघटना शस्त्रास्त्रांसह रस्त्यावर उतरल्या. धर्मांध मुस्लिमांनी बेंगाझी शहरात हातात बंदुका, पेटते बोळे घेऊन अमेरिकन दूतावासाला गराडा टाकला. लिबिया पोलिसांचा तुटपुंजा बंदोबस्त होता, पण धर्मांध मुस्लिमांची संख्या प्रचंड होती. अमेरिकी दूतावासावर तुफान गोळीबार करीत ग्रेनाईड हल्ला चढविला. ‘इस्लाम खतरे में’चा नारा देत रॉकेटस् डागली. दूतावासाने पेट घेतला. जीव वाचविण्यासाठी दूतावासातील अमेरिकन कर्मचारी तडफडत होते. राजदूत ख्रिस्तोफर स्टिव्हन्स हे कारमधून दूतावासाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच कारवरही रॉकेटस्चा मारा केला गेला. त्यात ख्रिस्तोफर हे जागीच ठार झाले.
धडा शिकवणार -ओबामा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या हिंसाचाराबद्दल संताप व्यक्त करून राजदूत ख्रिस्तोफर आणि इतर तीन अधिकार्यां चा मृत्यू धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
आमच्या नागरिकांचा बळी घेतला गेला असून, जगभरातील अमेरिकन राजदूत, अधिकारी, सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सुरक्षा द्यावी, असा आदेश आपण प्रशासनाला दिला आहे, असे ते म्हणाले. अमेरिका कुठल्याही धर्माच्या विरूद्ध नाही. लिबियाबरोबर आमचे संबंध चांगले आहेत. पण, आजच्या हल्ल्यातील दोषींना अमेरिका धडा शिकवेल, असा इशारा ओबामांनी दिला.