www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव लेफ्टनंट जर्नल निवृत्त खलीद नईम लोधी यांची हकालपट्टी केल्याने पाकिस्तानमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे सरकार- लष्कर आमने-सामने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानात सत्तांतराचे वारे वाहू लागलेत. गेल्या काही दिवसांपासून पाक सरकार आणि आयएसआय यांच्यामध्ये अमेरीकेशी संबंधित मेमोगेट प्रकरणावरुन वाद सुरु होते. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोप होत होते.
लोधी यांचा कार्यभार नर्गीस सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नईम लोधी घटनाबाह्य पावलं उचलल्याचं गिलानी यांचे म्हणणं आहे. लोधींच्या कृतींमुळे सरकारच्या विविध संस्थांमध्ये गैरसमज, तसंच विसंवाद निर्माण झाल्याचंही गिलानी यांनी म्हटलं आहे. पाक सैन्याने पंतप्रधानांच्या संरक्षण सचिवांवरील आरोपांबाबत हरकत घेतली आहे.
पाकिस्तानी सैन्याने या संदर्भात कॉर्प कमांडरची तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या १११ ब्रिगेडचे कमांडर म्हणून सरफराझ अली यांची नियुक्ती केल्याचं डॉन या वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे.