मुंबई : गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर 'डियर जिंदगी' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक गौरी शिंदे ज्यांनी या आधी अभिनेत्री श्रीदेवीसोबत तिचा पहिला सिनेमा 'इंग्लिश विंग्लीश' केला होता. गौरी शिंदेच्या करियरचा 'डियर जिंदगी' हा दुसरा सिनेमा आहे.
शाहरुख खानच्या रेड चिलीजची आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला 'डियर जिंदगी' या सिनेमाच्या निमित्तानं शाहरुख आणि आलिया प्रथमच बिग स्क्रिनवर एकत्र झळकणार आहेत. कसा आहे डिअर जिंदगी?, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी घ्या जाणून.
'डियर जिंदगी' या सिनेमाची गो़ष्ट आहे कायरा या तरुणीची. कायरा एक स्वतंत्र मुलगी आहे. तरुण आहे, प्रत्येक मुलीसारखी तिचीही अनेक स्वप्न आहेत, करिअरिस्टीक आहे. कायरा एक सिनेमाटोग्राफर आहे. खुप कमी वयातच आयुष्यातले अनेक चढ उतार तिनं अनुभवलेत. चेहऱ्यावर आनंद असला तरी डोक्यात बऱ्याच गो़ष्टी चालू आहेत. अनेकदा प्रेमात पडलीये मात्र त्यातही अपयश, अनेकदा ब्रेक अप झाल्यामुळे प्रेमावरचा विश्वासही उडालाय. मग अचानक एक दिवस डॉ जहांगीर खानसोबत तिची ओळख होते आणि सगळं काही बदलून जातं.
डॉ जहांगीर खान जी व्यक्तिरेखा साकारलीये अभिनेता शाहरुख खाननं. या सिनेमात तो एक सायकोलोजिस्ट प्ले करतोय. दिग्दर्शक गौरी शिंदेनं सिनेमा करण्याआधी अनेक अॅडफिल्म्स दिग्दर्शित केलेत. तिच्या आजवरच्या कामात कायमच वेगळेपणा जाणवतो. मग तो इंग्लिश विंग्लिश असो किंवा आताचा 'डियर जिंदगी' हा सिनेमा. एक खूप साधी सोपी तरी वेगळी गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न यात दिग्दर्शक गौरी शिंदे यांनी केलाय. सिनेमातले ब-यापैकी संवाद इंग्रजीत असल्यामुळे, हा सिनेमा सगळ्याच प्रकारच्या ऑडियन्सला भावेल यात शंका वाटतेय. सिनेमाची कथा आणि पटकथा गौरी शिंदेची आहे. कथा सुंदर आहे मात्र पटकथा थोडीशी फसलीये. सिनेमाची सुरुवात थोडीशी स्लो वाटते, मात्र शाहरुखच्या एंट्रीनंतर सिनेमाची पकड मजबूत होते.
अभिनेत्री आलिया भटचा अभिनय दिवसेंदिवस निखरताना दिसतोय. हायवे असो उडता पंजाब किंवा डियर जिंदगी, अभिनयाची एक वेगळीच परिभा़षा ती रुपेरी पडद्यावर रंगवू पहातेय. तिचा नटखटपणा, अल्लड़पणा, एवढच काय तर प्रत्येक इमोशनल सीनही आलियानं तितक्याच दमदार पद्धतीनं साकारलेत. इंटरवलच्या काही मिनिटांपूर्वीच शाहरुखची एंट्री होते, शाहरुखनं साकारलेला डॉक्टर जहांगीर खान कमाल झालाय. स्क्रिनवरचा त्याचा वावर, त्याचा लूक, अभिनय सुंदर आहे.
डिअर जिंदगीला संगीत दिलंय अमित त्रिवेदी यांनी. सिनेमाला खूपच पॅप्पी आणि युथफुल संगीत आहे. लव्ह यू जिंदगी हे गाणं सुंदर आहे, तर सिनेमाचा बॅकग्राउंड स्कोरही छान झालंय. सिनेमाटॉग्राफर लक्ष्मण उतेकर यांची सिनेमाटॉग्राफी कमाल आहे.
डियर जिंदगी या सिनेमाची स्टोरी, कॉन्सेप्ट आणि कलाकारांचे परफॉर्मेन्स कमाल आहेत. तरुण वर्गाला विशेषकरुन तरुणींना हा सिनेमा नक्कीच आवडेल याची खात्री वाटते, मात्र इतर ऑडियन्सला हा सिनेमा फार अपील करु शकणार नाही, आता उरला प्रश्न सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाल करु शकेल.. सरकारनं जुन्या नोटा बंद केल्याचा परिणाम पहिले दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर पहायला मिळाला होता, मात्र शाहरुख खान आणि आलिया भटचं फॅन फॉलोविंग पाहता, या आठवड्यात याचा किती परिणाम डियर जिंदगीवर होतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.