भोपाळ: पतीनं शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इयर' हा चित्रपट बघू न दिल्यानं निराश झालेल्या पत्नीनं अॅसिड प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाली आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील खनियाधारा इथं राहणारी नेहा सेन (वय २१) या विवाहितेचा पती विशाल हा 'हॅपी न्यू इयर' चित्रपट बघण्यासाठी एकटाच गेला होता. सिनेमागृहात गर्दी जास्त असल्याचं कारण देत विशालनं नेहाला सिनेमा बघायला नेलं नाही. यामुळं नेहा निराश झाली आणि या नैराश्याच्या भरात नेहानं अॅसिड प्राशन केलं. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिला तातडीनं शिवपुरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.
मात्र अॅसिडमुळं तिच्या शरीरातील अंतर्गत भागांमध्ये गंभीर दुखापत झाल्यानं तिला ग्वाल्हेरमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलंय. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी सखोल चौकशी करुनच नेहाच्या पतीविरोधात कारवाईचा निर्णय घेऊ असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.