मुंबई : राजमौलींचा बाहुबली-2 सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. पहिल्याच दिवशी राजमौलींच्या बाहुबली-2नं सव्वाशे कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दोन्ही बाहुबलीच्या यशानंतर आता राजमौली महाभारतावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. राजमौलींच्या या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत आमिर खान असेल असं बोललं जात होतं, पण आता कृष्णाची भूमिका हृतिक रोशन किंवा दक्षिण भारतातील अभिनेता महेश बाबू करतील असं बोललं जात आहे.
अमिताभ बच्चन या चित्रपटात भीष्म पितामहांच्या भूमिकेत दिसतील असं बोललं जातंय. अमिताभ यांनी २०१२ मध्ये अॅनीमेशन सिनेमा 'महाभारत' देखील भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती.
राजमौलींच्या या चित्रपटाचं बजेट ७०० कोटी रुपये असणार आहे. बॉलीवूडमध्ये आजपर्यंत एवढ्या बजेटचा एकही चित्रपट बनलेला नाही. हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगु आणि इंग्रजी भाषेत बनवण्यात येणार आहे. २०१८ साली या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल आणि २०१९च्या शेवटी किंवा २०२० मध्ये हा चित्रपट रिलीज होईल, अशी चर्चा आहे.