मुंबई : 'मी केलेल्या आयटम सॉंगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही' असं, 'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा - खानने स्पष्ट केलं आहे. मलायका बॉलीवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे.
दिल से या चित्रपटातील छैय्या छैय्या, दबंगमधील मुन्नी बदनाम या गाण्यांमधील दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या मलायका अरोरा खानचा मुलगा अरहान आता १३ वर्षांचा झाला आहे. विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानेही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे.
अरहानला त्याच्या आईच्या इमेजविषयी काय वाटते याची उत्सुकता सर्वांनाच असते. याविषयी मलायकाला प्रश्न विचारला असता मलायका म्हणते, मला डान्स करायला आवडते आणि ते मी मनापासून इन्जॉय करते. माझ्या कामाचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही. त्याला या गोष्टींची सवय झाली आहे.
माझा मुलगा अरहान अजून लहान आहे. पण त्याला माझे गाणे आवडले, तर तो स्वतःच मला येऊन सांगतो असे मलायकाने म्हटले आहे. गाणी हे चित्रपटातील महत्त्वाचे घटक असून गाण्यांमध्ये काम करणे हा नेहमीच मजेशीर अनुभव असतो. फक्त ते गाणे कसे चित्रीत केले जाते आणि ते कसे दाखवले जाईल हे महत्त्वाचे असते असे मलायकाने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.