जेरुसलेम : भारत आणि इस्त्राईल यांच्यामधील परराष्ट्र संबंधांचे यंदाचे हे २५ वे वर्ष! या २५ व्या वर्षाचे औचित्य साधून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढतर व्हावेत या उद्देशाने भारतीय दूतावासातर्फे ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ सहकार्याने ‘क्लासिकल रेव्होल्युशन III : सिल्क रोड रोन्देव्हुझ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे मुख्य संगीतकार म्हणून सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातून अशा प्रकारचे सादरीकरण करणारे नरेंद्र भिडे हे पहिलेच संगीतकार आहेत... या कार्यक्रमासाठी त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचा मिलाफ असणाऱ्या काही अभिनव रचना रचल्या होत्या, ज्यांचे सादरीकरण ‘जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या’ आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी केले.
या कार्यक्रमाची मूळ संकल्पना जगविख्यात ‘पर्क्युशनिस्ट’ ‘शेन जिम्बालिस्टा’ आणि प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना ‘शमा भाटे’ यांची होती.
श्री. नरेंद्र भिडे यांनी रचलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचे फ्युजन असणाऱ्या रचनांवरती प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांच्या ‘नादरूप’ या ग्रुपने सादरीकरण केले. तसेच प्रसिद्ध तबलावादक श्री. चारुदत्त फडके हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम २८ मार्च रोजी बिरशीबा येथे आणि ३० मार्च रोजी जेरुसलेम येथे आयोजित करण्यात आला होता.