नवी दिल्लीः ओलम्पिक पदक विजेती बॉक्सिंग चॅपियन ‘मेरी कॉम’ हिच्या आयुष्यावर बेतलेल्या कथेत प्रियांकानं जीव ओतून काम केलंय, असं खुद्द प्रियांकाचं म्हणणं आहे.
या चित्रपटासाठी आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेतलीय आणि यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही तरी खूप निराशा पदरी पडेल, असं प्रियांकाला वाटतंय.
32 वर्षीय अभिनेत्री प्रियांकासाठी ‘मेरी कोम’ हा तिच्या अत्यंत जवळचा आहे. याचं कारण सांगताना प्रियांका म्हणते, ‘या सिनेमाच्या शुटींगची सुरुवात माझ्या जीवनातील अत्यंत कठिण काळात झाली होती. पण, आपलं दु:ख बाजुला ठेऊन मी या चित्रपटातील सशक्त अभिनयासाठी जीव ओतलाय. सिनेमाचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक आव्हान होता. मी प्रत्येक दिवशी घरी जाऊन आईसमोर रडायचे... आणि म्हणायचे की मी हा चित्रपट पूर्ण करू शकणार नाही... पण, दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा शूटिंगला जायचे’
उमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कॉम’ या चित्रपटासाठी प्रियंकाला आपल्या शारीरिक क्षमतेसाठीही खूप मेहनत घ्यावी लागली. अपयशाला सामोरं जाणं अजून आपल्याल नीटसं जमलेलं नाही... त्यातही या सिनेमात अपयश मिळालं तर स्वत:च्याच नजरेला नजर देणंही कठिण होऊन जाईल असं प्रियांकाला वाटतंय.
या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमिअरसाठी 4 सप्टेंबरला प्रियांका टोरंटो इंटरनॅलनश फिल्म फिस्टिव्हलसाठीही उपस्थित होणार आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबर रोजी सिनेगृहात झळकणार आहे.