मुंबई : चित्रपटांच्या बाबतीत २०१५ हे वर्ष साधारण राहिलं. काही चित्रपटांची कथा ही अधिक दमदार होती पण त्यांना जास्त कलेक्शन करता आलं नाही. तर काही चित्रपट एवढे दमदार नसतानांही त्यांनी चांगली कमाई केली. काही चित्रपट असे होते ज्यांची कथा ही चांगली होती, कमाई पण चांगली केली सिनेप्रमींचं मनही जिंकलं.
२०१५ मधील १० दमदार चित्रपट :
१. बेबी : जानेवारी २०१५ मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमारचा हा चित्रपट संजय निरंजन यांनी दिग्दर्शित केला होता. बेबी सिनेमाने चांगलीच धम्माल केली. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासह डॅनी, अनुपम खेर आणि तापसी पन्नू यांचीही भूमिका होती. या सिनेमाने १०० करोडपेक्षा अधिक कमाई केली होती.
२. दम लगा के हईशा : फेब्रुवारी २०१५ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडनेकर यांनी खूपच शाब्बासकी मिळवली. खूपचं वेगळ्या प्रकारची लव्ह स्टोरी सिनेमामध्ये दाखवण्यात आली होती.
३. पिकू : मे २०१५ मध्ये रिलीज झालेला सिनेमा पिकूने अनेकांची मनं जिकंली. सुजीत सरकार दिग्दर्शित या पारिवारीक सिनेमामध्ये दीपिका पादुकोन, अमिताभ बच्चन आणि इरफान खान मुख्य भूमिकेमध्ये होते. कमाई एवढी करता आली नाही पण सिनेमा अनेकांच्या मनात उतरला.
४. तनू वेडस् मनू रिटर्न : या सिनेमात डबल रोलमध्ये दिसलेली कंगना रानौत भलतीच भाव खाऊन गेली. अभिनेता आर. माधवनही या सिनेमात प्रमुख सिनेमात दिसला. 'तनू वेडस मनू' या सिनेमाचा हा सिक्वेल होता.
५. दृश्यम : अजय देवगन आणि तब्बु यांच्या या सिनेमाला कमाई जास्त करता आली नाही पण सिनेमाची स्टोरीलाईन आणि अॅक्टींग ही प्रेक्षकांना आवडली. त्यामुळेच हा सिनेमा टॉप १० मध्ये आला.
६. बाहुबली : एस. एस. राजामौली यांनी बाहुबली या सिनेमाद्वारे भारतीय सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला. या सिनेमानं जगभरात ५०० करोडहून अधिक कमाई केली. या सिनेमाचा सिक्वेलही लवकरच येण्याच्या तयारीत आहे. बाहुबलीने भाईजानला चांगलीच टक्कर दिली.
७. बजरंगी भाईजान : खान भाईजान असतील आणि तो सिनेमा कमाई करणार नाही... हे तर शक्य नाही. भारत - पाकिस्तानच्या संबंधांवर भाष्य करणारा चित्रपट. त्यामुळे सलमान खानचा हा चित्रपट भलताच चालला. सलमान आणि कबीर खान यांनी 'बजरंगी भाईजान'च्या निमित्तानं एकत्र काम केलं.
८. मांझी- द माऊंटेन मॅन : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आप्टे यांच्या भूमिकेमुळे चित्रपट खूपच गाजला. चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना आपल्याकडे ओढलं. पण रिलीज आधीच सिनेमाची एचडी प्रिंट इंटरनेटवर लिक झाल्याने जास्त कमाई करता आली नाही.
९. तमाशा : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा तमाशा चांगलाच चालला. इम्तियाज अली दिग्दर्शित हा सिनेमा असल्याने स्टोरी खूपच हटके होती. सिनेमा तरुणांना लक्षात घेऊन तयार केल्याने तरुणांना सिनेमाने आपल्याकडे आकर्षित केलं.
१०. बाजीराव मस्तानी : २०१५ या वर्षाच्या शेवटी आलेल्या या सिनेमामध्ये दीपिका पदुकोन, प्रियंका चोपडा आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होते. स्टोरीलाईन आणि डायरेक्शनमध्ये सिनेमाने बाजी मारली. दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी खूपच सुंदरपणे चित्रपट पडद्यावर उतरवला.