मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला साथीदाराची गरज आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जी चिखलफेक झाली त्याची आठवण आता विरोधक करून देत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या जवळ शिवसेना येईलच, याची शाश्वती अजून तरी कुणी दिलेली नाही, मात्र भाजपातील अनेक नेते शिवसेनेसोबत युती होईल, अशी शक्यता गृहीत धरून आहेत, थोडक्यात सत्तेची चावी शिवसेनेकडे आहे.
भ्रष्टाचारवादी पार्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपाचा प्रचार करण्यासाठी अनेक सभा घेतल्या, त्या सभांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीवर ही राष्ट्रवादी नाही, तर भ्रष्टाचारवादी पार्टी असल्य़ाचं म्हटलंय.
हफ्ते वसुली करणारा पक्ष
शिवसेना आणि भाजपची युती तुटली त्यानंतर मुंबईत रेसकोर्सवर झालेल्या सभेत, शिवाजी महाराजाच्या जयंतीच्या नावावर हफ्ते वसुल करणारे शिवाजी महाराजांचे वंशज कसे असू शकतात? असा सवाल शिवसेनेवर केला होता.
विरोधकांचे सवाल
विरोधकांनी सवाल करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारलंय, आता 'भ्रष्टाचारवादी पार्टी' आणि 'हफ्ता वसुली पार्टी' पंतप्रधानांना चालेल का?.
अफझल खानाची फौज
दिल्लीहून अफझलखानाची फौज आली आहे हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य लोकं अजूनही विसरले नाहीत, आता अफझलखानाच्या फौजेसोबत बसून सरकार चालवणार का? असा सवाल व्हॉटस ऍपवर मेसेज फिरतोय.
सत्ता स्थापनेसाठी नाकीनऊ
संपूर्ण बहुमतासाठी भाजपाला साथीदाराची गरज आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जी चिखलफेक झाली, त्यावरून भाजपाच्या जवळ शिवसेना येईल, याची शाश्वती अजून तरी कुणी दिलेली नाही, भाजपातील अनेक नेते शिवसेनेसोबत युती झाली पाहिजे अशी शक्यता अजून गृहीत धरून आहेत, थोडक्यात सत्तेची चावी शिवसेनेकडे आहे.
हे कॉम्बीनेशन न पचणारं
राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील न होता बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव ठेवला असला, तरी राष्ट्रवादी आणि भाजप हे कॉम्बीनेशन दोन्ही पक्षातील नेत्यांना पचणारं नाही, ते झालं तरी काही दिवसांनी एवढी अॅसिडीटी होणार नाही, याची शाश्वती राजकारणातील भलेभले पंडित देऊ शकत नाहीत.
एकंदरीत भाजपसमोर सत्ता स्थापन करण्याचं संकट आहे, पण ते अजून दिसून आलेलं नाही, दोन दिवसातही चित्र स्पष्ट झालेलं नाही, पुढील काही दिवसात ते संकट अधिक वाढत जाणारं आहे.
मोदी लाट होती मग संपूर्ण बहुमत का नाही?
महाराष्ट्रात भाजप १२२ जागा मिळवून मोठा पक्ष ठरला असला, तरी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही. यावरून राज्यात मोदी लाटेचा प्रभाव कमी झाल्याचं म्हणता येईल. सत्ता स्थापन करण्यासाठी आता भाजपाला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीची गरज आहे, हे आकडे सांगतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.