काँग्रेसचं 'मिसमॅनेजमेंट'; धीरज देशमुखांची संधीच 'मिस'!

विधानसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपलीय. अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांमध्ये धावपळ झाली. मात्र सर्वात जास्त गोंधळ काँग्रेसच्या उमेदवारीवरून झाल्याचं दिसतंय.  

Updated: Sep 27, 2014, 06:23 PM IST
काँग्रेसचं 'मिसमॅनेजमेंट'; धीरज देशमुखांची संधीच 'मिस'! title=

मुंबई : विधानसभेसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपलीय. अखेरच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांमध्ये धावपळ झाली. मात्र सर्वात जास्त गोंधळ काँग्रेसच्या उमेदवारीवरून झाल्याचं दिसतंय. अनेक जागांवर अखेरच्या क्षणाला उमेदवार बदलण्यात आले आणि नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं एबी फॉ़र्म देण्यावरून अखेरच्या क्षणापर्यंत घोळ सुरू असल्याचं चित्र दिसंलं. 

धीरज देशमुख यांची संधी हुकली...
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात कसा सावळागोंधळ आहे, याचं उत्तम उदाहरण लातूर ग्रामीणमध्ये पाहायला मिळालं... माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव धीरज देशमुख यांना काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी तिकीटाची लॉटरी लागली होती... मात्र, त्यांची ही संधी हुकली.

लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार वैजनाथ शिंदे यांचं तिकीट कापून, त्रिंबक भिसे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हट्टामुळं ऐनवेळी भिसे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली... आणि धीरज देशमुख यांना काँग्रेसनं तिकीट दिलं... 

पण, धीरज देशमुख यांचं दुर्दैव असं की, अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांना वेळेत जमा करता आली नाहीत. त्यामुळं त्यांची संधी हुकली... तेव्हा काँग्रेसनं पुन्हा एकदा त्रिंबक भिसे यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं.

'मला नकोय, मुलाला द्या उमेदवारी...'
काँग्रेसच्या उमेदवारीबाबतचा आणखी एक घोळ समोर आलाय़. धुळे ग्रामीण मतदारसंघातून रोहिदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र रोहिदास पाटलांनी निवडणूक लढवण्यास नकार देऊन मुलाला उमेदवारी देण्याचा हट्ट धरला. त्यामुळं अखेरच्या तासांत त्यांचा मुलगा कुणाल पाटील यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. 

यादीत नितेश राणेंचा विसर...
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आज (शनिवार) आणखी १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, या दुसऱ्याही यादीत नितेश राणे यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता होती. त्याचवेळी नारायण राणे यांना फोनवर नितेश यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात आले. आता नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर नारायण राणे कुडाळमधून अर्ज दाखल करतायेत.  

अशोक चव्हाण नाही अमिता चव्हाण रिंगणात...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी अखेर भोकरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय... काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणूनच त्यांनी अर्ज भरलाय. शेवटच्या क्षणापर्यंत अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम होता. खासदार अशोक चव्हाण यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. अखेर अमिता चव्हाण यांच्याच गळ्यात काँग्रेस उमेदवारीची माळ पडली. 

पृथ्वीराज चव्हाणांनी कराडमधून भरला अर्ज
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मतदार संघातून शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली.  मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गर्दीत चव्हाणांनी मोठी रॅली काढली. कालच चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.