मुंबई: स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषणवणारे फडवणीस हे विदर्भातील चौथे नेते आहेत.
मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपाच्या विधीमंडळपक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळल्याने नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांसमोर मांडला. तर गडकरींसाठी आग्रही असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी फडवणीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं. यानंतर सर्वानुमते फडणवीस यांची विधीमंडळ नेता म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली.
यानंतर पक्ष निरीक्षक राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा यांनी फडणवीस यांची निवड झाल्याची अधिकृतरित्या जाहीर केले. वयाच्या ४४ वर्षी मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे फडणवीस हे शरद पवारांनतर सर्वात कमी वयाचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर फडणवीस समर्थकांनी एकच जल्लोष केला.
मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा कोअर कमिटीतील अन्य सदस्य संध्याकाळी सहाच्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा करतील. ३१ ऑक्टोबरला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपा नेते जे.पी. नड्डा यांनी दिली. शुक्रवारी भाजपाचे काही नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. सुरुवातीला आम्ही छोटे मंत्रिमंडळ स्थापन करणार आहोत. शिवसेनेसोबत चर्चा सुरु असून यात सकारात्मक तोडगा निघेल अशी आशाही नड्डा यांनी व्यक्त केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.