मुंबई: भाजपमधील मुख्यमंत्रिपदासाठीची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी आता या शर्यतीत उडी घेतलीय. त्यांनी स्वत:चा उल्लेख मास लीडर असा केलाय. तसंच भाजपचे इतर नेते मेट्रो लीडर असल्याचं खळबळजनक विधान त्यांनी केलंय.
देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे अणि सुधीर मुनगंटीवार यांची ताकद आपापल्या क्षेत्रांपुरतीच मर्यादित आहे. गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर हे सर्व राज्यपातळीवर काम करू लागल्याचंही वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय.
सत्तेमध्ये बसण्याचा अंदाज येताच भाजपचे राज्यातील नेते त्यांच्यापरिनं मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगू लागले आहेत. परळी या त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीची धामधुम संपल्यावर पंकजा शुक्रवारी मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. जनतेचा मोठा पाठिंबा असलेल्या भाजपच्या नेत्या अशी ओळख तयार करण्यात पंकजा मुंडे यशस्वी झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी राज्यभरात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून तशी चुणूक पंकजा मुंडे यांनी भाजपच्या इतर शहरी नेत्यांना दाखवून दिली आहे.
जर राज्यामध्ये सरकार स्थापण्यात भाजप यशस्वी झाल्यास भाजपचे नेते एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या बरोबर पंकजा मुंडे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असणार आहेत.
पंकजा त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वकांक्षेला ठामपणे दुजोरा देत आहेत. या मोठ्या जबाबदारीसाठी त्यांचा प्रशासकीय अनुभव कमी असल्याचे पंकजा यांच्या लक्षात आणून दिल्यावर, मुख्यमंत्रीपदासाठीच्या इतर दावेदारांना देखील या मोठ्या जबाबदारीचा अनुभव नसल्याचं त्या सडेतोडपणे सांगतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.