मुंबई: ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सकाळी ८ वाजेपासून २८८ विधानसभा आणि बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २६९ ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होणार असून, अवघ्या तासाभरात मतदारांचा कल समजू शकेल. दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येतील, असं निवडणूक आयोगानं कळविलं आहे.
१३व्या विधानसभेसाठी १५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात मतदान झालं. एकूण ८ कोटी ३३ लाख ९० हजार ३९६ मतदारांपैकी ५ कोटी २६ लाख ४५ हजार १२७ जणांनी (६३.१३ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र चुरशीच्या लढती झाल्यामुळं मतदानाचा टक्का लोकसभेपेक्षा ६.६३ टक्क्यांनी वाढला. गेल्या २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपाची युती आणि राज्यात गेल्या १५ वर्षांपासून सत्तेवर असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळं सर्वच ठिकाणी चौरंगी, पंचरंगी सामने झाले. यामुळं उमेदवारांची संख्या चार हजारांवर पोहोचली.
आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. अर्ध्या तासतच पहिल्या फेरीचे निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचं सर्व चित्र जवळपास स्पष्ट झालेल असेल.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यानं ही निवडणूक राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरली आहे. यामुळं ठिकठिकाणी पंचरंगी लढती झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
गेल्या पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलनं वर्तवला आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच शिवसेना दोन नंबरचा पक्ष म्हणून पुढं येईल असं एक्झिट पोलच्या अंदाजात पुढं आलं आहे.
त्यामुळं सत्ता कोण्याच्या हाती असेल यासाठी आपल्याला काही तासांची वाट पाहावी लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.