ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या ३४ मतांनी विजयी मिळाला होते. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी... 

Updated: Oct 8, 2014, 02:05 PM IST
 title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या ३४ मतांनी विजयी मिळाला होते. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी... 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - सुभाष मयेकर
भाजप - प्रमोद जठार
काँग्रेस - नितेश राणे
राष्ट्रवादी - अतुल रावराणे

एकीकडे विजयदुर्ग तर दुसरीकडे वैभववाडी आणि तिस-याबाजूला कणकवली असा हा कणकवली विधानसभा मतदारसंघ. सिंधुदुर्गातील शांत मतदारसंघ अशी याची पूर्वीची  ओळख होती मात्र आता हा वादळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय.

२००९ च्या निवडणुकीत भाजपच्या प्रमोद जठार यांनी गोगटे घराण्याकडून आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आणि ते थेट आमदार झाले.  

या निवडणुकीत प्रमोद जठार यांना ५७ हजार ६५१ मते मिळाली. तत्कालीन राणे समर्थक कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांना ५७ हजार ६१७ मतं मिळाली. 

अत्यंत चुरशीच्या लढतीत  प्रमोद जठार यांनी केवळ ३४ मतांनी  विजय मिळवला.. 

हीच ३४ मते राणे विरोधकांना लोकसभेच्या निकालापर्यंत विरोधक वाढवत गेली. 

यावेळी विरोधकांनी कितीही दावे केले तरी आपण ३४ हजारापेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणारच असा दावा आमदार जठार करतायत.

२००९ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत दुफळीचा फटका कॉंग्रेस उमेदवाराला बसला आणि भाजपला फायदा झाला. यावेळी कॉंग्रेस पुर्ण ताकदीनीशी आणि एकदिलाने उतरणार आहे. 

राजन तेली आणि विजय सावंत हे जरी नाराज असले तरी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि स्वाभीमानचे नितेश राणे हेच रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.

या मतदारसंघातील विकास कामांचा विचार करता जठार यांनी पहिली दुधडेअरी सुरु केली, तसेच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला कासर्डेमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून केला जातोय.

आमदारांकडून विविध विकास कामे केल्याचा दावा केला जात असला तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. रस्त्यांचा प्रश्न जैसे थे आहे,देवगडमध्ये मच्छीमारांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, विजयदुर्ग किल्ल्याची दूरवस्था झालीय. तसेच आनंदवाडीतील जेट्टीचा प्रश्न कायम आहे.

जठारांचा नारायण राणेंशी असलेला राजकिय संघर्ष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला या मतदारसंघातून मिळालेले बळ तसेच नितेश राणेंची संभाव्य उमेदवारी यामुळे आगामी विधानसभा निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

एकुणच या आगामी निवडणूकीत देवगड हा भाजपला तर वैभववाडी आणि कणकवली काँग्रेसला अनुकुल असं चित्र दिसतंय... मात्र काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणावी तेव्हढी सोपी असणार नाही. कारण अंतर्गत विरोधाचा सामना काँग्रेसला करावा लागणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.