सिंधुदुर्ग : अथांग पसरलेला समुद्र, किल्ले सिंधुदुर्ग आणि कुडाळचा रमणीय परीसर असा हा कुडाळ विधानसभा मतदार संघ, १९९० पासून नारायण राणेंचा हा बालेकिल्ला.
मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज संस्थेवर एकहाती सत्ता आणि शेवटच्या दिवशी राणेंची हुकमी सभा या तंत्राने कुडाळ मतदारसंघ राणेंचा गड मानला जातो.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - वैभव नाईक
भाजप - विष्णू मोडकर
काँग्रेस - नारायण राणे
राष्ट्रवादी - पुष्पसेन सावंत
२००९ च्या निवडणुकीत नारायण राणे यांना ७१ हजार ९२१ मतं मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी झुंज देत ४७ हजार ६६६ मतं मिळवली. या निवडणुकीत नारायण राणे यांना २४ हजार २५५ मताधिक्य मिळालं होतं.
नुकतेच पार प़डलेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात ७४ हजार१२३ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.निलेश राणे यांना ५२ हजार २४० मतं मिळाली.
इतिहासावर नजर टाकल्यास राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या मालवण पोटनिवडणुकीत राणेंनी विरोधकाचं डिपॉझीट जप्त केलं होतं.
तसेच २००९ च्या निवडणुकीत नारायण राणेंना २४ हजारांचे मताधिक्य याच मतदारसंघ मिळालं होतं.
आणि याच मतदारसंघात नुकतेच पारप़डलेल्या लोकसभा निव़डणुकीत युतीच्या उमेदवाराला तब्बल22 हजारांचं मताधिक्य मिळालंय.
या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अलिकडच्या काळात बदलली असली तरी जनता पुन्हा आपल्याबाजूने कौल देईल असं उद्योगमंत्री नारायण राणेंना वाटतंय.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात विमानतळचा प्रश्न मार्गी लावला,सीवर्ल्ड प्रकल्पाची उभारणी, नाट्यगृहाची उभारणी ही काही महत्वाची आणि मोठी कामे आपण केल्याचा दावा नारायण राणे यांनी केलाय.
मात्र, काही प्रश्न अद्यापही बाकी आहेत. टाळंबा धरण रखडले,सीवर्ल्ड प्रकल्पाला जनतेचा विरोध, मच्छीमारांचे प्रश्न हे प्रश्न अद्यापही बाकी आहेत. याच मुद्यांवरुन विरोधक नारायण राणेंना घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे..तसेच शिवसेनेनेही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसलीय.
नारायण राणे यांच्या विरोधात यावेळीही कुडाळ मालवण मतदार संघात शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक रिंगणात असतील हे नक्की आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनीही निवडणूकसाठी तयारी सुरु केलीय. त्याचा फटका शिवसेनेला कितपत बसेल यात शंका आहे.
पण सामान्य मतदारांची सत्ताधा-याविरुद्ध नाराजीमुळे शिवसेनेला पोषक वातावरण आहे हे नाकारुन चालणार नाही.
नारायण राणे हे या निवडणुकीत कोणताही धोका नक्कीच पत्करणार नाहित हे निश्चित आहे.
जवळच्यांना दूर करुन राणेंनी पुन्हा वातावरण निवळण्याचा प्रयत्न केलाय तोही नाकारुन चालणार नाही.
या मतदारसंघात नितेश राणे यांनी वैयक्तिक लक्ष घालून केलेली संघटना बांधणी ही मतदारांचा उत्साह वाढवणारी आहे. पण तरीही शिवसेना पक्षप्रमुखांनी या मतदारसंघात विजयासाठी घातलेले साकडे आणि मेहनत नाकारून चालणार नाही.
राणेंच्या या बालेकिल्यात आता सरदार आणि सैनिक कुणाच्या बाजुने राहतात त्यावरुनच हा बालेकिल्ला कुणाचा हे ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.