ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - खामगाव

पांढरं सोनं म्हणजे अर्थातच कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावमध्ये काँग्रेसच्या दिलिपकुमार सानंदा यांनी विजयाची हॅटट्रिक साधलीयं. मात्र खामगावचा विकास केवळ मोठमोठ्या इमारती बांधून होणार नाही, असा खोचक सवाल भाजप नेते करताहेत. या राजकीय लढाईत गोरगरिबांचा विकास मात्र जरा बाजूलाच पडलाय. 

Updated: Oct 8, 2014, 01:42 PM IST
 title=

बुलडाणा : पांढरं सोनं म्हणजे अर्थातच कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावमध्ये काँग्रेसच्या दिलिपकुमार सानंदा यांनी विजयाची हॅटट्रिक साधलीयं. मात्र खामगावचा विकास केवळ मोठमोठ्या इमारती बांधून होणार नाही, असा खोचक सवाल भाजप नेते करताहेत. या राजकीय लढाईत गोरगरिबांचा विकास मात्र जरा बाजूलाच पडलाय. 

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधासभा मतदार संघात गेली काही वर्षे प्रामुख्याने राजकारण रंगतेय ते दोन नेत्यांभोवती... आणि हे नेते म्हणजे काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा आणि दुसरे भाजपचे विधान परिषदेतील माजी विरोधीपक्षनेते पांडुरंग फुंडकर... त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे गट निवडणुकीच्या तयारीला लागलेत. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - हरिदास उरसाड
भाजप - आकाश फुंडकर    
काँग्रेस - दिलीप सानंदा
राष्ट्रवादी - नानाभाऊ कोकरे

खामगाव मतदारसंघाचा चेहरा पाहता या मतदारसंघात एकूण 2 लाख 63 हजार 104 मतदार आहेत. 

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिलीपकुमार सानंदा यांना 64051 मते, तर भाजपाचे धोंडीराम खंडारे यांना 56131 मते मिळाली. या लढतीत सानंदा 7920 च्या मताधिक्याने विजयी झाले. 

खामगाव विधासभा मतदार संघातून तीन वेळा विजयी झालेले आमदार दिलीपकुमार सानंदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षात मतदारसंघात विविध प्रकारची विकासकामे केल्याचं सानंदा यांचं म्हणणं आहे. यामध्ये...

विकासकामं
- खामगाव शहर सुशोभीकरणाची कामे
- नगर पालिकेच्या प्रशाकीय इमारतीची उभारणी
- विलासराव देखमुख शेतकरी भवन 
- शेतक-यांसाठी शिदोरी गृह
- पाणीपुरवठा योजना
- घरकुल योजना 
अशा योजना राबवत सानंदा यांनी गोरगरिब जनतेसाठी आपण सदैव कार्यरत असल्याचं म्हटलंय. 

विरोधक मात्र सानंदा यांचा हा विकासाचा दावा खोडून काढत आहेत. आमदारांना विकास समजलाच नाही, अशी टीका भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांनी केलीये. नुसत्या मोठमोठ्या ईमारती बांधून विकास होत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सर्वसामान्य जनता मात्र विकासापासून वंचित आहे. 

समस्या
- पाच वर्षात एकही सिंचन प्रकल्प नाही
- वाढती पाणीटंचाई
- एमआयडीसीमधील अनेक उद्योग बंद
- वाढती बेरोजगारी 
 
विकासाची काही प्रमाणात कामे झाली आहेत. मात्र वर्षानुवर्ष काही समस्या आहे तशाच आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांबाबत जनतेच्या संमिक्ष प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत. 

जनतेचा यशस्वी कौल मिळालेल्या सानंदा यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. त्यामुळे चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलाय. तर दुसरीकडे लोकसभेतील भाजपला मिळालेलं यश पाहता यंदा पांडुरंग फुंडकर यांनी त्यांच्या मुलाला आकाश फुंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. एकूणच सानंदा यांना पराभूत करण्यासाठी भाजपला या मतदारसंघात चांगलीच कंबर कसावी लागणार हे नक्की... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.