सातारा : माण खटाव विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ येतो. तर यंदाच्या विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेत.
सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदार संघ... दुष्काळ विधानसभा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. आणि त्यामुळेच गेल्या चार दशकांपासून इथलं राजकारण केवळ पाण्याभोवती फिरत आहे.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
रणजीत देशमुख - शिवसेना
काँग्रेस - जयकुमार गोरे
राष्ट्रवादी - सदाशिव पोळ
मनसे - धैर्यशील पाटील
अपक्ष - शेखर गोरे (रासप)
सातारा जिल्ह्यातील या विधानसभा मतदार संघाचा माढा लोकसभा मतदार संघात समावेश होतो. पूर्वीपासूनच हा मतदार संघ राखीव होता. परंतू आता हा मतदार संघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. या मतदार संघाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी नवा आमदार या मतदार संघाने दिला आहे.
यापूर्वी माजी आमदार धोंडीराम वाघमारे, कै. माजी आमदार संपतराव अवघडे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि विद्यमान आमदार जयकुमार गोरे असा राजकीय इतिहास आहे. मात्र राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्यासाठी किंगमेकरची भूमिका घेणा-या सदाशिव पोळ यांना आतापर्यंत कधीही आमदार होता आले नाही.
गतवेळी अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याशी दोन हात करित विजयश्री मिळविला. आमदार जयकुमार गोरे यांनी घोषीत केल्याप्रमाणे जिहे कटापूर योजनेसाठी ६२ कोटी रुपये निधी उपलब्ध केला.
उरमोडी धरणाचे पाणी खटावमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. पाणलोटचे ४५० तलाव मतदार संघात तयार झाले. सिमेंट साखळी बंधार-यांसाठी मुख्यमंत्री साहित्य निधीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला.
मतदार संघात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार केले. पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी जिरायती शेतकडून बागायतीकडे वळू लागला आहेत. ४० वर्षात विरोधकांना जे जमले नाही ते ५ वर्षात आपण करुन दाखवल्याचा दावा आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे.
जयकुमार गोरे यांच्या या दाव्यातून विरोधकांनी मात्र हवा काढून घेतलीय. माजी आमदार येळगावकरांप्रमाणेच रणजितसिंह देशमुख यांनीही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केलीय.
हरणाई सुत गिरणी आणि प्रस्तावित माणदेशी सुत गिरणी या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. माण खटाव मतदार संघातील दुष्काळी जनतेला आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागले आहेत.
मात्र, मोठ्या प्रमाणात कारखानदारी निर्माण झाली नाही.. या विधानसभा मतदारसंघात बेकारीची समस्या असल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे. माण खटाव विधानसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीवर नजर टाकल्यास काँग्रेस आघाडीत कधीच सख्य नव्हतं.
तसेच विद्यमान आमदारांनी केलेल्या पाझर तलावांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जातंय आणि त्याचा फटका आमदार जयकुमार गोरे यांना बसण्याची शक्यत नाकारता येत नाही.
माजी आमदार सदाशिव पोळ हे युवा पिढीला विश्वासात घेत नसल्यामुळे तरुणाई त्यांच्यावर नाराज आहे. तसेच जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे निवडणूक रिंगणात उतरत आहेत मात्र त्यांच्यावरील वाळूसम्राट हा शिक्का कसा पुसणार हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे.
एकूणच ही निवडणूक आता बहुरंगीय होणार असून दुष्काळी भागात या निवडणूकीत पैशाचा पाऊस पडेल, अशी जनतेत चर्चा सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.