ठाणे, सोलापूर : तब्बल २ हजार कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा ठाणे पोलिसांनी सोलापुरातून जप्त केलाय. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांना अटक करण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ठाण्यातून ओकाय सिप्रेन चिन्नास या नायजेरीयन व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातूनच २ किलो एफेड्रीन या अमली पदार्थासह सागर पोवळे या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या अंमली पदार्थाची तार सोलापुराशी जोडलेली पोलिसांना आढळलं.
यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमधून धनेश्वर स्वामीला अटक केली. चौकशीअंती त्यानं बेकायदेशीर १० टन एफेड्रिन साठवून ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी एव्होन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर राजेंद्र जगदंबाप्रसाद डिमरी यालाही पोलिसांनी अटक केली.
एव्होन कंपनीचं गोदाम पोलिसांनी सील केलंय. ठाणे पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. यामध्ये त्यांना सोलापूर पोलिसांचीही महत्त्वाची मदत झाली.